प्रतिनिधी / आजरा
शेत, शिवारात पिकांमध्ये धुमाकूळ घालणारा हत्ती आता थेट गावात दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. शनिवार दि. 25 रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास हत्तीने हाळोली गावात गल्लीतून रपेट मारली. आजवर शेतामध्ये किंवा गावालगत येणारा हत्ती आता थेट गावात आल्याने हाळोली ग्रामस्थांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले आहे.
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात एका टस्करसह दोन हत्तीनी गेल्या काही वर्षांपासून तळ ठोकलेला आहे. या विभागातील हाळोली, वेळवट्टी, देवर्डे, दर्डेवाडी व मसोली आदि गावच्या हद्दतील शेतीमध्ये हत्तींचा सातत्याने वावर आहे. ऊस पिकासह इतर सर्वच पिकांची तसेच बांबूसह झाडांचीही नुकसान हत्तीकडून केली जात आहे. शेतात ठेवण्यात आलेल्या शेतीच्या औजारांचीही मोडतोड हत्तीकडून केली जात आहे. हत्तीकडून होणार्या सततच्या नुकसानीने या विभागातील शेतकरी त्रस्त झाला आहे. हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्यांकडून वारंवार केली जात आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी यातील एका हत्तीने हिरण्यकेशी नदी पार करून पेरणोलीसह सोहाळे, खेडे, मडिलगे व तेथून पुन्हा मुंगूसवाडी, साळगांव मार्गे नदी ओलांडून पुन्हा पश्चिम भागात प्रवेश केला आहे. तालुक्यात या हत्तींचा संचार मुक्तपणे सुरू आहे. दिवसभर जंगलात थांबून राहणारे हत्ती अंधार पडताच उभ्या पिकांमध्ये शिरून नुकसान करीत आहेत. शेतातसह मानवी वसाहतीपर्यंत हत्ती येण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र गाव जागा असताना रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास थेट गल्लीतून रपेट मारण्याचा प्रकार हाळोतली शनिवारी रात्री घडल्याने हत्तीची ही कृती लोकांसाठी निश्चितपणे धोक्याची घंटा आहे.
रात्रीची जेवण करून हाळोली ग्रामस्थ घराच्या दारात बसलेले असताना हत्तीने थेट गावात शिरून गल्लीतून रपेट मारली. काही अतिउत्साही तरूणांनी गल्लीतून रपेट मारणाऱया हत्तीचा व्हीडीओ मोबाईलमध्ये केला आहे. ग्रामस्थांनी गल्लीतून जाणार्या हत्तीचाही पाठलाग केला, हत्तीला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने हत्ती माघारी फिरला नाही म्हणून दुर्घटना टळली. गावात हत्ती शिरल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या कर्मचार्यांनी हाळोली येथे जाऊन हत्तीला चाळोबादेव जंगलात हुसकावून लावले. मात्र गावातून हत्ती गेल्याने हाळोली ग्रामस्थांमध्ये मात्र भितीचे वातावरण पसरले आहे.








