प्रतिनिधी/ बेळगाव
चंदगड जि. कोल्हापूर येथील आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. बेळगाव-सावंतवाडी व्हाया चंदगड रामघाटरोड रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. हा मार्ग झाल्यास त्याचा फायदा बेळगाव, चंदगड तसेच कोकणासाठी होणार आहे. चंदगड परिसरातील शेती व उद्योगांना यामुळे चालना मिळेल. त्यामुळे हा मार्ग करण्याबाबत प्रयत्न करावेत. अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली.
बेळगाव-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. हा मार्ग जोडल्यास घाटमाथ्यावरील चंदगड व बेळगावचा थेट संपर्क कोकणाशी होणार आहे. यामुळे शेती उद्योग तसेच इतर व्यवसायांना हा रेल्वे मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. दररोज बेळगाव-सावंतवाडी या मार्गावर अनेक प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे या मार्गाच्या कामाला लवकर सुरुवात करावी, अशी मागणी पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्र्यांकडे केली. याचबरोबर विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.









