वृत्तसंस्था/ हॅनोई
कोरोना महामारीचे नवे रूग्ण पुन्हा आढळल्याने व्हिएतनाम शासनाने आपल्या देशातील राष्ट्रीय फुटबॉल लीग स्पर्धा तहकूब करण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला.
गेल्या 100 दिवसांच्या कालावधीत व्हिएतनाम शासनाने कोरोना प्रसारावर चांगलेच नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले होते. जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीत व्हिएतनामध्ये स्थानिक कोरोना रूग्ण आढळला नाही पण व्हिएतनाममधील देनांग या मध्यवर्ती शहरामध्ये 57 वर्षीय निवृत्त व्यक्तीला कोरोना झाल्याचे आढळून आले. त्याच प्रमाणे आणखी तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या कारणामुळे व्हिएतनामधील सर्व राष्ट्रीय लीग फुटबॉल स्पर्धा तहकूब केल्याची घोषणा व्हिएतनाम व्यावसायिक फुटबॉल फेडरेशनने केली आहे. व्हिएतनाममधील फर्स्ट डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेला 29 जुलै रोजी प्रारंभ केला जाणार होता पण आता ही स्पर्धा तहकूब करण्यात आली आहे. संपूर्ण व्हिएतनाममध्ये कोरोना परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यात या देशाच्या शासनाला यश मिळाले आहे. आतापर्यंत गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत या देशात 420 जणांना कोरोनाची बाधा झाली होती आणि या महामारीत एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही.









