वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अफगाणिस्तानातील शीख समुदायाचे 11 सदस्य रविवारी नवी दिल्ली येथे पोहोचले आहेत. विशेष विमानाद्वारे या सर्वांना दिल्ली येथे आणले गेले आहे. तालिबानी दहशतवाद्यांच्या तावडीतून वाचविण्यात आलेली मुलगी आणि गुरुद्वारातून अपहरण करण्यात आलेल्या निदान सिंग यांचाही यात समावेश आहे. हे सर्वजण व्हिसावर भारतात आले आहेत. हिंदुस्थानच माझी माता आणि पिता असल्याचे उद्गार यादरम्यान भावुक झालेल्या निदान सिंग यांनी काढले आहेत.
अफगाणिस्तानच्या पकटिया प्रांताच्या गुरुद्वारामधून निदान सिंग यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. निदान यांच्या मुक्ततेसाठी त्यांच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले होते. भारताच्या प्रयत्नांमुळेच निदान यांची मुक्तता होऊ शकली आहे. 16 वर्षीय मुलीचेही अपहरण करण्यात आले होते. मुलीचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांनी चालविला होता. या मुलीलाही वाचविण्यात आले आहे.









