दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी/कोल्हापूर
लक्षतीर्थ वसाहत येथील एका कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री छापा टाकला. यावेळी जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून रोख रक्कम, 6 मोबाईल, सहा दुचाकी असा दोन लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी अर्जुन गोपाळ मांढरे (वय-24, रा.सोमवार पेठ), निहाल मोहम्मद पैलवान ( 22, रा. कनाननगर), विनायक उर्फ विनय सुरेश यादव (30, सानेगुरुजी वसाहत), उत्तम जयसिंग झेंडे (30, शनिवार पेठ), विनायक मुरलीधर शिंगाडे ( 50, शनिवारपेठ), संभाजी विलास घाटगे (36, रा. उत्तरेश्वर पेठ), अनुप आनंत सोलापुरे (35, रा. लक्षतीर्थ वसाहत) यासर्वांवर गुन्हा दाखल झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लक्षतीर्थ वसाहत येथील एका कारखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर जुगाव सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यामाहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक केली. कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे आदेश झुगारून तोंडाला मास्क न लावता अथवा सोशल डिस्टन्सचे उल्लंघन करून जुगार खेळत होते. त्यांच्याकडून रोख रक्कम 34 हजार, 6 मोबाईल व सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस नाईक रणजित कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.