ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अमेरिका हैराण झाली असतानाच तिथे आता नव्या आजाराने डोके वर काढले आहे. अमेरिकेच्या 11 राज्यात ‘सायक्सोस्पोरा’ या नव्या आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत.
सौम्य ताप, थकवा, पोट फुगणे, मळमळ आणि भूक न लागणे ही या आजाराची लक्षणे आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 640 लोकांना सायक्सोस्पोराची लागण झाली आहे. त्यामधील 37 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पॅकेट्समध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलेड्समुळे हा आजार होतो. पॅकेट्समधील अन्न किंवा पाणी प्यायल्यास हा नवीन आजार एक आठवड्यानंतर उद्भवतो, असे डॉक्टरांकडून सांगण्यात येते.
दरम्यान, अमेरिकेत आतापर्यंत 43 लाख 15 हजार 709 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 20 लाख 61 हजार 692 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या अमेरिकेत 21 लाख 04 हजार 619 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 18 हजार 984 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 49 हजार 398 जणांचा मृत्यू झाला आहे.