ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील शॉपिंग मॉल्समध्येही आता महागडी आणि विदेशी दारू मिळणार आहे. त्यासाठी आवश्यक परवाना प्रक्रिया उद्यापासून (दि.27) सुरू होणार आहे. सरकारचा महसूल वाढविण्यासाठी उत्तरप्रदेशातील उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे. अपर मुख्य सचिव संजय भूसरेड्डी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
भूसरेड्डी म्हणाले, उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयानुसार शॉपिंग मॉल्समध्ये महागडे आणि आयात केलेले 700 रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे ब्रँड मिळतील. तसेच 160 रुपयांपेक्षा अधिक किंमतीची विदेशी बिअर विकता येणार आहे. शॉपिंग मॉल्सला दारू आणि बिअर विकण्याची परवानगी देण्यात आली असली तरी देखील मॉल्समध्ये मद्यपान करण्यास परवानगी नाही.
भारतात तयार होणाऱ्या स्कॉच, ब्रँडी, जिन आणि वाइनचे महागडे ब्रॅन्डही मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असतील. दारू विकण्यासाठी मॉल्सना परवाना काढावा लागेल. त्यासाठी वार्षिक परवाना फी १२ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.









