वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताकडून होणारी कच्च्या तेलाची आयात जून महिन्यात मोठय़ा प्रमाणात खालावली आहे. ऑक्टोबर 2011 नंतर म्हणजेच 9 वर्षांच्या कालावधीत हे प्रमाण नीचांकी राहिले आहे. भारत जगाचा तिसऱया क्रमांकाचा कच्च्या तेलाचा ग्राहक आहे. जूनमध्ये भारताने प्रतिदिन 3.2 दशलक्ष बॅरल्स (बीपीडी) कच्चे तेल प्राप्त केले आहे. मे महिन्याच्या तुलनेत 0.4 टक्के तर मागील वर्षाच्या तुलनेत यात 28.5 टक्क्यांची घट झाली आहे. जून 2009 नंतर पहिल्यांदाच भारताने व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात केलेली नाही.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसह रिलायन्स इंडस्ट्रीज, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने देखभाल कार्यासाठी प्रकल्प बंद करण्याची योजना आखली आहे. भारतात सर्वसाधारणपणे जूनपासून सुरू होणाऱया पावसाळय़ात इंधनाची मागणी कमी होते. पहिल्या सहामाहीत देशाच्या काही भागांमध्ये कोरोना संकटामुळे लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. या लॉकडाउनमुळे देखील इंधनाची मागणी खालावली आहे.
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर जूनमध्ये इराकने सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून सौदी अरेबियाची जागा घेतली आहे. तर संयुक्त अरब अमिरात आणि नायजेरियाने अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्थान प्राप्त केले आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठय़ाप्रकरणी अमेरिका पाचव्या स्थानावर आहे.
भारतात आखातातून होणारी कच्च्या तेलाची आयात जूनमध्ये वाढून 7 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजेच 67.12 टक्क्यांवर पोहोचली आहे. तर दक्षिण अमेरिकेतून होणारी आयात 11 वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. भारताने व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात करणे थांबविले आहे. अमेरिकेच्या निर्बंधांमुळे भारताला हे पाऊल उचलावे लागले आहे.
खासगी तेलशुद्धीकरण कंपनी नायरा एनर्जीने व्हेनेझुएलातून होणारी कच्च्या तेलाची आयात रोखली आहे. भारताच्या तेल आयातीत ओपेकची हिस्सेदारी जूनमध्ये 5 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली आहे.









