चिपळूण
तालुक्यातील रामपूर परिसरातील जंगलमय भागात बेकायदेशीर सुरु असलेल्या हातभट्टीवर उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या पथकाने धाड टाकल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आली असून 26 हजार रूपये पिंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुरुनाथ सहदेव हळदणकर (रावळगाव-शिंदेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. रामपूर परिसरातील कातळवाडी या जंगलमय ठिकाणी हळदणकर हा गावठी हातभट्टी चालवत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी मिळाली होती. त्या आधारे एक पथक तयार करुन त्यांच्या मार्गदर्शनखील गुरुवारी या हातभट्टीवर धाड टाकली. यावेळी टाकलेल्या छाप्यात हळदणकर याला पोलिसांनी रंगेहात पकडले. यावेळी पोलिसांनी 170 लिटर गावठी हातभट्टीची दारु, गुळ, नवसागर यासह प्लास्टीक पॅन, भांडी असा एकूण 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी हळदणकर याच्यावर चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस फौजदार चव्हाण, पोलीस नाईक इम्रान शेख, महेश जाधव, संतोष कुळे, सकपाळ, यादव आदींच्या पथकाने केली.









