बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. दररोज बाधित रुग्णांमध्ये वाढ होताना पहायला मिळत आहे. सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळांना सुट्टी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळा बंद ठेवल्या आहेत. पण राज्यसरकारने शाळा सुरु करण्याचा विचार केला होता. यापार्श्वभूमीवर मनुष्यबळ विकास मंत्रालयाशी झालेल्या बिठकीतील चर्चा लीक झाल्यानंतर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. 1 सप्टेंबरपासून शाळा सुरू करणे हा निर्णय नव्हे तर केवळ विचार होता. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याविषयीची बाब सभेत व्यक्त केलेली एक सामान्य कल्पना होती. असे त्यांनी म्हंटले आहे.
सत्य हे आहे की शाळांमध्ये सामान्य परिस्थिती येईपर्यंत शाळा सुरु करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असे मंत्री सुरेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत सरकार शैक्षणिक क्षेत्राच्या बदललेल्या परिस्थितीवर चर्चा करीत आहे, असे मंत्री सुरेश कुमार यांनी म्हंटले आहे.









