वार्ताहर/वेतवडे
धामणीखोऱ्यातील कोदवडे (ता. पन्हाळा) येथे भर पावसात कळे ते म्हासुर्ली मुख्य रस्त्यालगत राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पाइपलाइनचे काम जीसीबीच्या सहाय्याने सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर चिखलातुन वाहनधारकांना प्रवास करावा लागत असुन ठेकेदाराच्या मनमानी कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे.
कोदवडे येथे जानेवारी 2020 ला राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली होती. त्यानंतर संपूर्ण गावातील अंतर्गत पाइपलाइनचे काम फेब्रुवारी महिन्यात पुर्ण करण्यात आले. पण मुख्य रस्त्यालगतची पाइपलाइन मागे ठेवण्यात आली. सध्या कोरोनामुळे प्रशासनाने प्रलंबित बीले काढण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे बिलाची रक्कम परत जाईल या भितीपोटी उर्वरित काम पुर्ण करण्यासाठी ठेकेदार व कोदवडेतील सरपंच यांची धडपड सुरू आहे. पण भर पावसात रस्त्याकडेला जीसीबीच्या सहाय्याने चार फुट खोल खुदाई सुरू असल्याने रस्त्यावर चिखल पसरल्याने वाहनधारकांना वाहन चालवताना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेला खुदाई केल्याने अवजड वाहने रुतण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष द्यावे व जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाने याची चौकशी करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.