दुर्घटनेत चालकाचा मृत्यू, प्रूट मार्केटजवळील घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
बंद अवस्थेतील कचरावाहू वाहन उतारावरून पुढे सरकल्याने त्या वाहनावरून पडून चालकाचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे प्रूट मार्केटजवळ ही घटना घडली. वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे.
जितेंद्र बापू डावाळे (वय 35) रा. ज्योतीनगर, गणेशपूर असे त्या दुर्दैवी चालकाचे नाव आहे. रविवारी पहाटे प्रूट मार्केटजवळ कचरा भरताना ही घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेतील जितेंद्रला सिव्हिल हॉस्पिटलला हलवताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे.
जितेंद्र व त्याचे सहकारी केए 37, 5770 क्रमांकाच्या वाहनातून कचरा भरण्यासाठी प्रूट मार्केटजवळ गेले होते. उताराला वाहन उभे करून कचरा भरण्याचे काम सुरू होते. चौघे जण कचरा भरून देत होते तर जितेंद्र त्या वाहनावर उभा राहून तो घेत होता. अचानक याच वेळेला थांबलेले वाहन पुढे सरकल्याने तोल जाऊन तो खाली पडला.
त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. वाहतूक उत्तर विभाग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक नंदीश कुंभार व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.









