कोरोना साथीच्या थैमानाने संकटामागून संकटे आणि पाठोपाठ चिंता वाढवणाऱया वार्तांचा रतीब सुरू असताना दोन आनंद वार्ता आल्या आहेत आणि त्या सकारात्मक असल्याने जगण्याचे बळ वाढवणाऱया आहेत. पहिली वार्ता आहे कोरोनावरील लसीची तर दुसरी आहे अयोध्येतील राम मंदिराच्या पायाभरणीची. एकूणच संकट सरणार यांची ही चुणूक म्हणावी लागेल. तथापि, संकट संपलेले नाही याचे भानही ठेवावे लागेल. रोज येणारे कोरोनाचे आकडे थरकाप उडवत आहेत. रोज देशात 30 ते 35 हजार जणांना लागण होत आहे. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन करण्याची नामुष्की आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने भारतात समूह संसर्ग सुरू झाला असे म्हटले आहे. समूह संसर्ग म्हणजे प्रवास केलेला नाही, रूग्णाच्या सहवासात नाही आणि बाधा झाली. बाधा कशी झाली ते कळत नाही. कोरोना संदर्भात जनसामान्य आणि धनदांडगे मध्यमवर्गीय पुरेसे गंभीर दिसत नाहीत. कोरोनाचे महासंकट घोंघावत असताना अनेकांना गटारी अमावस्या आणि दारू चिकन मटण पावसाळी सहली यात रस आहे. गर्दी नको, सोशल डिस्टन्स पाळा, अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर नको, स्वच्छता पाळा, मास्क वापरा असे ओरडून ओरडून सांगितले तरी लोक गावभर हिंडत आहेत. दारू-मटणाच्या दुकानांसमोर रांगा लावत आहेत आणि जागोजागी गर्दी करत आहेत. ओघानेच अनलॉक एक दोनचा प्रवास पुन्हा मागे वळवत काही शहरात लॉकडाऊन करायची नामुष्की आली आहे. भारतात मुंबई व त्यातही धारावी हा कोरोना हॉटस्पॉट बनला होता पण, धारावीतील कोरोना आटोक्यात येत आहे. रा. स्व. संघाने तेथे त्यासाठी कष्ट घेतले आहेत असे म्हटले जाते. त्याच जोडीला मुंबई महापालिकेने तेथे राबवलेला 24 कलमी कार्यक्रम उपयुक्त ठरला आहे. हा मुंबई पॅटर्न आता पुणे व देशात कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या अन्य भागात राबवला जाणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी कोरोना आटोक्यात ठेवणे शक्य आहे. पण, लस सापडल्याशिवाय कोरोना संपवणे शक्य नाही असे म्हटले आहे. आणि अवघे विश्व कोरोनावर परिणामकारक लस व औषध यांची प्रतीक्षा करते आहे. स्वातंत्र्यदिनी ही लस येणार. थोडा वेळही लागू शकतो अशी चर्चा असताना कोरोनावरील स्वदेशी लसीची मानवी चाचणी सुरू झाली आहे. अशी आनंदवार्ता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. त्यांनी कोरोना लसीच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची सकारात्मक चिन्हे आहेत. लवकरच कोरोनावर पूर्ण विजय मिळेल असे म्हटले आहे. देशात सुमारे 14 संशोधन संस्थातील शास्त्रज्ञ कोरोना लसीसाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. जगभरही असे प्रयत्न सुरू असून विविध दावे केले जात आहेत. पण लस प्रमाणबद्ध होऊन गरिबातील गरीब माणसापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत कोरोना दहशत राहणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना लढा निर्णायक टप्प्यावर आला आहे. आणि सर्व संशोधनावर आयएमआरचे लक्ष आहे. एकूणच आरोग्यमंत्र्यांची ही घोषणा खूपच दिलासादायक आणि आशा जागवणारी आहे. 15 ऑगस्टचा मुहूर्त पकडायचा असे धोरण दिसते. अमेरिकेतही मॉडर्ना कंपनीला लस गवसली असे म्हटले जाते. या कंपनीचा शेअर दुप्पट, चौपट वाढला अशी वार्ता आहे. एकूणच कोरोनाविरुद्धची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. पण, या आनंदाने हुरळून जाण्याची ही वेळ नाहे. उलट अधिक जबाबदारीने, स्वयंप्रेरणेने शिस्त व नियम यावर भर दिला पाहिजे आणि शिस्त व नियम यासाठी सामाजिक दबाव निर्माण केला पाहिजे. कोरोना लसीची जशी आनंदवार्ता तशी अयोध्येत राम मंदिराच्या पायाभरणीचा मुहूर्त निश्चित झाला आहे. 5 ऑगस्टला राम मंदिराचे भूमिपूजन करण्याचे निश्चित करण्यात आले. 161 फूट उंचीचे हे दोन मजली भव्य मंदिर तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होणार आहे. भाजपा व रा. स्व. संघाचा वर्षानुवर्षे जो कार्यक्रम होता, त्यामध्ये370 कलम रद्द, राम मंदिर, समान नागरी कायदा वगैरे प्रमुख बाबी होत्या. मोदींनी या कार्यक्रमावर भर दिल्याचे दिसते आहे. कोरोना संकटामुळे अवघे विश्व आणि भारतही अडचणीत आहे. भारताचे शेजारचे शत्रू पाकिस्तान व चीन हे कायम त्रास व कुरबुरी करतात. त्यांचा बंदोबस्त करण्यातही मोदींनी बऱयापैकी यश मिळवले आहे. आत्मनिर्भर भारत अशी घोषणा आहे. स्वदेशीचा नारा देत चीनच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. अनेक अडचणी व आर्थिक प्रश्न आहेत. पण संकटातही संधी शोधण्याची जिद्द आणि धडपड आहे. अशावेळी राम मंदिराची पायाभरणी आणि रामलल्लाचे भव्य दिव्य मनोहरी देवालय सार्वमताने सगळे वाद संपवून लोकदेणगीतून उभा राहते आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रभू राम हा भारतीयांचा आदर्श आहे. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी राम हा आदर्श आहे. प्रभूरामाचे हे मंदिर विश्वभरच्या भारतीयांना आणि अवघ्या मानवजातीला प्रेरणा देईल हे वेगळे सांगायला नको. सुमारे 10 कोटी लोकांच्या देणगीतून हे मंदिर उभारले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पायाभरणी करणार आहेत. या मंदिराच्या निर्माणामागे अनेक आंदोलने, न्यायालयीन निवाडे असा इतिहास आहे. आणि अलीकडेच झालेली सर्वमताची एकता हा त्यावर कळस आहे. त्यामुळे राम मंदिराचा कळसाचा उंच उंच ध्वज अनेक अर्थानी प्रेरणादायी ठरणार आहे. आनंदाच्या या साऱया वार्तांना लवकरच मूर्त स्वरूप येईल मानवी जीवनात राम येईल तो दिवस भाग्याचा. तूर्त या आनंदवार्ता कोरोनाच्या काळय़ाकुट्ट अंधारात प्रकाश देणाऱया पणतीसारख्या आहेत. त्या पणत्या जपून ठेवल्या पाहिजेत. या शुभवार्तांचे स्वागत आहे. उजाडते आहे. संकटाचा ढग, महामारीचा अंधार संपतो आहे.
Previous Articleमजनू उस्मानाबादी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








