दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न
वर्षभरासाठी तीन पुस्तके
मराठी माध्यम पहिली ते सातवीसाठी
एकात्मिक पाठय़पुस्तक योजनेचा पथदर्शी प्रकल्प
इयत्तावार सर्व विषयांची एकत्रित पुस्तके तीन भागात
सर्व विषयांची मुखपृष्ठे एकाच पुस्तकावर
कुडाळ तालुक्यात अंमलबजावणी
भाग्यविधाता वारंग / झाराप:
विद्यार्थ्याला आता आपली पाठय़पुस्तके कुठे आहेत हे शोधावे लागणार नाही किंवा सर्व पाठय़पुस्तकांचा एकत्रित भारही दप्तरातून न्यावा लागणार नाही. विद्यार्थी-पालकांसाठी आनंदाची बाब म्हणजे सर्व पुस्तकांचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षात टप्प्याटप्प्याने अशी तीन पुस्तके अभ्यासावी लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक पाठय़पुस्तक योजनेच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत कुडाळ तालुक्मयातील मराठी माध्यमाच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळांकडे ही पुस्तके वितरित करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वाढते ओझे कमी करण्याची चर्चा सातत्याने सुरू होती. विविध दप्तरांच्या आकाराच्या अनुषंगाने मार्केट इशूही अव्वाच्या सव्वा होत होते. परंतु आता पुस्तकांची संख्या कमी करण्याचा प्रायोगिक प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (पुणे) यांच्याकडून समग्र शिक्षा अंतर्गत पथदर्शी प्रकल्प यावषी राबविण्यात आला आहे.
द्विभाषिक आशयाची निर्मिती
शालेय स्तरावर मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सर्व विषयांचे एकत्रीकरण ही संकल्पना राबविण्यात आली आहे. ही पुस्तके तयार करताना प्रामुख्याने गणित व विज्ञान विषयातील संज्ञा, संकल्पना, संबोध यांचे इंग्रजी अर्थ देण्यात आले आहेत. या विषयांचे आकलन प्रभावी, उपयुक्त आणि परिणामकारक करण्यासाठी द्विभाषिक आशयाची निर्मिती हा एकात्मिक पाठय़पुस्तक योजना प्रकल्पाचा मुख्य हेतू असल्याचे मंडळाचे संचालक विवेक गोसावी यांनी नमूद केले आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीत एक पुस्तक
शालेय स्तरावरील शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याला वेळापत्रकाप्रमाणे प्रत्येक विषयाचे पाठय़पुस्तक, वहय़ा, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, कंपास पेटी इत्यादी साहित्य दप्तरातून घेऊन जावे लागते. विद्यार्थी केवळ ज्ञानसंपन्न न राहता शारिरीकदृष्टय़ा सुदृढ असण्याचा मुद्दाही चर्चेत होता. प्रमाणापेक्षा अधिक वजनाच्या दप्तरामुळे, विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी, मानसिक ताण आधी आजार निर्माण होत असल्याचे पुढे येत होते. हे सर्व टाळण्यासाठी विविध उपाययोजना, सूचनांची अंमलबजावणी शासन स्तरावरून सुरू होती. यानुसार इयत्तानिहाय सर्व विषयांच्या आशयाचे एकत्रीकरण करून पाठय़पुस्तकाचे तीन भाग तयार करण्यात आले आहेत. हे तीन भाग स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक-एक करून स्वतंत्रपणे सोबत घेऊन जाता येणार आहे. सर्वसाधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत एक पुस्तक वापरता येणार आहे.
गणित, विज्ञान विषयांसाठी द्विभाषिक स्वरूप
इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयांच्या संदर्भात विविध संबोध, संकल्पना यांचे इंग्रजी अर्थ समजावेत, सोपेपणा वाढावा, यासाठी मराठी शब्दापुढे इंग्रजी शब्द देण्यात आले आहेत. त्यासाठी रंगसंगती वेगळी ठेवण्यात आली आहे. हे देत असतानाच इंग्रजी भाषा शिकविणे हा हेतू नसून केवळ दोन्ही विषयांचे स्वरूप द्विभाषिक ठेवण्यात आले आहे. दैनंदिन जीवन आणि पुढील शैक्षणिक स्तराच्या अनुषंगाने असे करण्यात आले आहे. मराठी माध्यमातून अध्ययन होत असताना विद्यार्थ्यांना गणितीय आणि वैज्ञानिक संकल्पनांचे अर्थ इंग्रजीतून समजले व त्याविषयी शिक्षकाने अध्यापन करताना थोडे स्पष्टीकरण केले, तर विद्यार्थ्यांचे अध्ययन सहजसोपे होईल, असा मध्यवर्ती विचार करण्यात आला आहे.
मांडणी आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून
पाठय़पुस्तकांची मांडणी ही आंतरविद्याशाखीय दृष्टीकोनातून करण्यात आली आहे. प्रत्येक विषयाच्या पाठांची संख्या पुरेशी ठेवली असल्याने पूर्वज्ञान किंवा आशयाचे संबंधित पुढील व मागील संदर्भ अभ्यासण्यासाठी अडचण येणार नाही, अशी योजना करण्यात आली आहे.
शैक्षणिक वर्तुळात स्वागत
शैक्षणिक वर्तुळात या पुस्तकांचे स्वागत करण्यात येत आहे. इयत्तावार पुस्तकांच्या मुखपृष्ठांना वेगवेगळे रंग हवे होते. पुस्तकांचे तीन भाग केले आहेत. त्याऐवजी दोन भाग केले असते, तर पहिल्या सत्रात एक व दुसऱया सत्रात एक किंवा चार भाग केले असते, तर पहिल्या सत्रात दोन व दुसऱया सत्रात दोन भाग वापरणे सुलभ झाले असते. शासनाच्या या नवीन पथदर्शी प्रकल्पाबाबत अभिप्राय, सूचना मंडळाकडे कळवाव्यात, असे आवाहनही करण्यात आले आहे.









