प्रतिनिधी / वैभववाडी:
राज्य शासनाने घरगुती गणेश मूर्तीच्या उंचीसंदर्भातील घालून दिलेल्या अटी सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी लागू राहणार नाहीत. खास बाब म्हणून ही अट रद्द करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी वैभववाडी येथे स्पष्ट केले. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे जिल्हय़ातील मूर्ती कारागिरांना तसेच गणेश भक्तांना दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मूर्ती चार फुटाची, तर घरगुती गणेश मूर्ती दोन फुटाची असावी, अशी अट घातली होती. यावर पालकमंत्री सामंत यांनी स्वतःच या बाबीचा खुलासा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात गणेशोत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. त्या खालोखाल रत्नागिरी जिल्हय़ात गणेशोत्सव होतो. मागील गणेश विसर्जनानंतर मूर्तिकार पुढील गणेशोत्सवाच्या मूर्ती बनवण्यास सुरुवात करतात. जिल्हय़ात बहुतांश मूर्तिकारांनी गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. त्यात ग्रामस्थांच्या मागणीनुसार पूर्वांपार चालत आलेल्या उंचीच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यात जिल्हय़ात गणपतीचा पाट देण्याची प्रथा आहे. नोव्हेंबरमध्येच हे पाट देऊन झाले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांवर मूर्तीच्या उंचीची अट लादणे चुकीचे होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कारवाई न करण्याच्या सूचना
सिंधुदुर्ग जिल्हय़ाकडे गणेश मूर्तींच्या उंचीबाबत खास बाब म्हणून बघावे लागेल. याबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासन पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून निर्णय घेत असते. मात्र त्यात सिंधुदुर्ग जिल्हा वगळण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन फुटांपेक्षा उंच गणेश मूर्ती असल्यास कारवाई करू नये, अशा सूचना त्यांनी तहसीलदार व पोलीस अधिकाऱयांना दिल्या.
‘प्लाझ्मा थेरपी’साठी रक्तदान करा
गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सव काळात कोरोना रोखण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले. जे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यांना प्लाझ्मा थेरपीसाठी रक्त देण्यासाठी आवाहन करण्याच्या सूचना सामंत यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱयांना दिल्या. अशा पॉझिटिव्ह रुग्णांना जिल्हाधिकारी व पालकमंत्री या नात्याने आपण पत्र देऊन आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.









