ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे बिहार सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, बिहारमध्ये आता 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे. अजून लॉक डाऊनसाठी नवीन नियमावली जाहीर नाही केली आहे. मात्र ती लवकर जारी करण्याची शक्यता आहे.

सोमवारी या संदर्भात एक प्रस्ताव तयार करण्यात आला. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आज मुख्य सचिव दीपक कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये वाहन परिचलनासाठी काय नियम असावेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सुरू करण्यास परवानगी द्यावी का? यावर निर्णय घेतला. सध्या तरी राजधानी पाटणा सोबत 12 जिल्ह्यात 16 जुलैपर्यंत लॉक डाऊन सुरू आहे.
धार्मिक स्थळे सुरू करण्यास अनुमती दिलेली नाही. फळे आणि भाजीपाला मार्केट केवळ सकाळी आणि संध्याकाळी सुरू ठेवली जात आहेत. तर कोरोनामुळे त्रासलेल्या प्रशासनाने बिहारमधील अनेक जिल्ह्यांत 10 ते 16 जुलै पर्यंत लॉक डाऊन आधीच जारी केले आहेत. त्यानंतर आता पुन्हा 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. लवकरच या संदर्भात नवी नियमावली जारी करण्यात येईल.









