वेळ संपल्यानंतरही रस्त्यावरील गर्दी हटेना
वार्ताहर/ कराड
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी जिल्हय़ात केवळ सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र व्यापाऱयांकडून या आदेशाचे पालन होताना दिसत नाही. जोपर्यंत दुकाने बंद करा म्हणून सांगायला पोलिस येत नाहीत, तोपर्यंत काही भागातील व्यापारी दुकाने बंद करीत नाहीत. तर वेळ संपल्यानंतरही उशिरापर्यंत शहरातील रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसत आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या सतराशेच्या घरात गेली असून जिल्हय़ात दररोज 80 ते 100 कोरोना बाधित सापडत आहेत. वाढत्या रूग्ण संख्येला ब्रेक लावण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हाफ लॉकडाऊन केला आहे. वेळ कमी असल्याने दुपारच्या वेळी शहरात खरेदीसाठी लोकांची तुंबळ गर्दी होत आहे. रस्त्यात अक्षरश: वाहतूक कोंडी होत असल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. किराणा व मोबाईलच्या दुकानात सर्वाधिक गर्दी होत आहे. काही व्यापाऱयांकडून खबरदारीची उपाययोजनाही राबवली नाही. एकावेळी दुकानात 20 ते 25 ग्राहक असल्याने दुकाना खचाखच गर्दी होत आहे.
दुपारी दोन वाजता दुकाने बंद करण्याची वेळ असतानाही शहरातील अनेक भागातील व्यापारी वेळ संपल्यानंतरही दुकाने बंद करीत नाहीत. अक्षरश: दररोज पोलिसांना फिरून व्यापाऱयांना दुकाने बंद करा म्हणून सांगावे लागत आहे. पोलीस आल्यानंतरच दुकाने बंद होत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील एका कापड व्यापाऱयाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर सोमवारी शुक्रवार पेठेतील एका व्यावसायिकाला कोरोनाची बाधा झाली आहे. एका बाजूला शहरासह परिसरातील गावांत कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने व्यापाऱयांनी स्वत:बरोबरच ग्राहक व नागरिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
दुकानातील गर्दीवर नियंत्रण येणे गरजेचे
शहरातील ठरावीक किराणा व मोबाईलच्या दुकानात प्रमाणापेक्षा जास्त गर्दी होत आहे. दुकानात मोजकेच ग्राहक घेण्याचे आदेश असताना प्रत्यक्षत मात्र 20 ते 25 ग्राहक दाटीवाटीने थांबत आहेत. यामुण्s सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होत नाही. तर दुकानात येणाऱया ग्राहकांना सॅनिटाईज करण्याची सोयही करण्यात आलेली नाही.








