पोलिसांच्या कार्याचा गौरव व्हावा! : ग्रामस्थांची पालकमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी / मसुरे:
कोरोना संचारबंदीच्या काळात येथील एका गरीब आणि काहीसे मानसिक संतुलन बिघडलेल्या ग्रामस्थाचे राहते झोपडीवजा घर पावसात नादुरुस्त होऊन त्याला गळती लागली. जेव्हा हे मसुरे पोलिसांना समजले, तेव्हा तेथे त्वरित जाऊन संपूर्ण घराला प्लास्टिक ताडपत्रीने आच्छादन करून या ग्रामस्थाला राहण्यासाठी सुरक्षित निवारा करून दिला. मसुरेतील तीन पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे त्यांचे कौतुक होत आहे. शंकर मसुरकर यांच्यासाठी मसुरेतील त्रिदेव पोलीस देवदूतच ठरले आहेत.
मसुरे पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱया 14 गावांमध्ये शासनाच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मसुरे पोलीस नेहमीच कार्यरत आहेत. मसुरे येथील तीन पोलीस कर्मचारी हवालदार पी. बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय, विवेक फरांदे हे वेळोवेळी गोरगरिबांना मदत करतात. काही तक्रारदार महिलांना औषधोपचार, जीवनावश्यक वस्तूंचे वाटपही त्यांनी केले आहे.
गरिब दाम्पत्याला निवाऱयासाठी केली मदत
मसुरे येथील शंकर मसुरकर आणि आणि त्यांची मूकबधीर पत्नी हे दोघेजण मर्डे येथील झोपडीवजा घरात राहत होते. त्यांना अपत्य नाही. शंकर यांचे काहीसे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांच्या राहत्या घराचे छप्पर नादुरुस्त झाले होते. पाऊस सुरू झाल्याने या जोडप्याला मोठा त्रास सहन करावा लागत होता. सर्वत्र गळती असल्याने या जोडप्याला आत राहणेही कठीण बनले होते. हे मसुरे पोलीस जायभाय, फरांदे, नाईक यांना समजले. त्यांनी त्वरित उच्च प्रतीची प्लास्टिकची ताडपत्री स्वखर्चाने घेऊन शंकर मसुरकर यांच्या घराच्या छताला ताडपत्रीचे आच्छादन करून त्यांना घर राहण्यायोग्य करून मदत केली. हे कुटुंब गरीब असल्यामुळे त्यांना आर्थिक मदतही केली आहे. शंकर मसुरकर यांनी याबाबत मसुरे पोलिसांचे साश्रू नयनाने आभार मानले.
तीन पोलीस कर्मचाऱयांच्या कार्याला सलाम
खाकी वर्दीच्या मागेही माणूसच दडलेला असतो. आपले कर्तव्य कठोरपणे बजावतानाच लॉकडाऊनमुळे कुणाची उपासमार होऊ नये, कुणाला कष्टाचा सामना करावा लागू नये, तर कोणीही औषधोपचाराविना राहू नये, यासाठी मसुरे पोलीस बांधव नेहमीच कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी मसुरे बाजारपेठ येथील छोटी-छोटी कामे करणाऱया युवकालाही रोज जेवण व नाश्ता मसुरे पोलीस देत आहेत. येथील एका हॉटेल कामगाराची परिस्थिती गरीब असल्याने त्यालाही जीवनावश्यक साहित्याची खरेदी करून ते साहित्य घरपोच करण्याचे काम या पोलीस बांधवांनी केले आहे. कामाच्या पलिकडे जाऊन सामाजिक भावना जोपासत ज्या पद्धतीने हे तिन्ही कर्मचारी कार्य करत आहेत, त्याला ग्रामस्थांनी सलाम केला असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. जिल्हय़ाचे पालकमंत्री उदय सामंत, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी या कामाची दखल घेऊन प्रशासनातर्फे या तिन्ही कर्मचाऱयांचा गौरव करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. होमगार्ड रजत मेस्त्राr, चतुर चव्हाण, ओंकार पडवळ, स्वप्नील मयेकर, सातार्डेकर यांनी याकामी पोलिसांना मदत केली.









