प्रतिनिधी/ चिपळूण
चिपळूण नगर परिषदेतील निवृत्त अधिकाऱयाचा रविवारी जिल्हा रूग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या मृताचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले, मात्र रविवारी सायंकाळपर्यंत अहवालाबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त होवू शकलेली नाह़ी खबरदारी म्हणनू या मृताच्या नातेवाईकांना पेढांबे येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
काही वर्षापूर्वी नगर परिषदेच्या बांधकाम विभागातून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले हे अधिकारी बहादूरशेखनाका परिसरात रहात होते. काही दिवसांपूर्वी त्यांना ताप येत होता. उपचार करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने ते शनिवारी कामथे रूग्णालयात दाखल झाले. त्यांचे नमुने घेऊन त्यांना जिल्हा रूग्णालयात हलवण्यात आले. येथे उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्याचा अहवाल आला नसला तरी लक्षणे कोरोनाशी संबंधित असल्याने येथील प्रशासकीय यंत्रणेने त्यांच्या नातेवाईकाचे नमुने घेत त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केले. सध्या मृतदेह जिल्हा रूग्णालयात असून अहवाल आल्यावर दफनविधी कोठे करायचा, याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच रविवारी गोवळकोट रोड येथील कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या अल हाजी अपार्टमेंटमध्ये आणखी दोन, फातिमा अपार्टमेंटमध्ये 1 अशा तीन नव्या रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे तालुक्याचा आकडा आता 166वर गेला आहे.









