19 कोरोनामुक्त झालेल्यांना सोडले घरी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिह्यात कारोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आह़े रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालांमध्ये 13 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत़ यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 864 झाली आहे. तर 19 जण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 589 झाली आहे.
नव्याने सापडलेल्यांमध्ये रत्नागिरी 1, संगेमश्वर 2, कामथे 3, दापोली 2, गुहागर 2, रायपाटण 2, कळंबणी 1 येथील रूग्णांचा समावेश आह़े रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसीमधील कंपनीत आणखी एका रूग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आह़े मागील आठवडय़ात याच कंपनीमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळला होता. या कर्मचाऱयासोबत काम करणाऱया 8 ते 9 कर्मचाऱयांना क्वारंटाईन करून त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. सुरुवातीला सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर सर्वांना घरी सोडण्यात आले. मात्र एका कर्मचाऱयाचा अहवाल संशयास्पद वाटल्याने त्याची पुन्हा टेस्ट करण्यात आली. या टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आणि शनिवारी रातोरात त्या कर्मचाऱयाला उपचारासाठी कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले.
रविवारी बरे झालेल्या 19 रूग्णांना घरी सोडण्यात आल़े यामध्ये 6 घरडा, 11 रत्नागिरी व 2 समाजकल्याण रत्नागिरीमधील आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत आजपर्यंत एकूण 12 हजार 436 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 11 हजार 878 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 864 अहवाल पॉझिटीव्ह आले असून 11 हजार 2 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 558 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 558 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
रिपोर्ट येण्याआधीच चुकीची दिली गेली
मिरजोळे एमआयडीसी कंपनीमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाला अधिकृत रिपोर्ट येण्याआधीच चुकीची दिली गेली, अशी माहिती रूग्णांना देण्यात येऊ नये म्हणून सक्त सूचना कोव्हीड लॅबला देण्यात आल्या आहेत. यापुढे असा प्रकार घडल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे प्रभारी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.
खेडमध्ये आणखी एक कोरोनाबाधित
खेड: शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरातील बाजारपेठेत आणखी एकास कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. हा रूग्ण एका राजकीय पक्षाचा ज्येष्ठ पदाधिकारी असून संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे. नगर प्रशासनासह आरोग्य यंत्रणेची धावाधाव सुरू झाली आहे. शहरात आणखी एक कोरोनाचा रूग्ण आढळल्याने नगर प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोनाबाधित रहात असलेल्या परिसरात कन्टेनमेंट झोन जाहीर करण्यात आला असून या ठिकाणी जाणारे सर्व मार्ग अडवण्यात आले आहेत. कोरोनाबाधिताच्या संपर्कात 42जण आल्याची माहिती पुढे आली असून त्यानुसार सर्वांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू होते.
एकाच कुटुंबातील पाचजण पॉझिटिव्ह
गुहागर: तालुक्यातील शृंगारतळी येथील प्रसिद्ध व्यापाऱयासह त्याच्या घरातील एकूण 5जणांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले आहे. शनिवारी रात्री त्यांच्या कुटुंबातील आणखी दोघेजण पॉझिटिव्ह आल्याने संख्या वाढली आहे. तसेच एका पक्षाचा पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे शृंगारतळीत आणखी संक्रमण झाल्याची भीती व्यक्त होत असून हायरिक्स व लो रिक्स पकडून तब्बल 256 जणांची यादी तयार करण्यात आली आहे. गुहागरमध्ये अचानक कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाने सुरूवात करून हादरा दिला आहे. व्यापारी संघाच्या बैठकीतून झालेल्या संक्रमणातून पक्षाच्या पदाधिकाऱयाला कोरोना झाला असल्याचे पुढे आल्याने आता हा पदाधिकारी आणखी कितीजणांशी संपर्कात होता, याची गणना पूर्ण झाली असून तब्बल 107 जणांची यादी तयार झाली आहे. या पदाधिकाऱयाच्या घरातील एकूण 17 जणांना हायरिस्क व उर्वरितांना लोरिक्स पकडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. रविवारी त्या प्रसिद्ध व्यापाऱयाच्या कुटुंबातील दुसरा मुलगा व सून यांना कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. त्यांच्याबरोबर असलेले 3 वर्षाचे लहान मुल निगेटीव्ह आले असले तरी आई-वडिलांसोबत तोसुद्धा कोविड केअर सेंटरमध्ये राहणार आहे. या संक्रमणातील आतापर्यंत 28जणांचे स्वॅब घेतले असून त्याचा अहवाल अजून प्रलंबित आहे. शनिवारी 16, तर रविवारी 12जणांचे स्वॅब घेण्यात आले असल्याने येत्या 2 दिवसात आणखी कितीजण संक्रमित निघतात, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
राजापुरातील आणखी दोघांचे अहवाल पॉझिटीव्ह
राजापूर: तालुक्याचा ग्रामीण भाग कोरोनामुक्त होत असतानाच शहरात मात्र दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. शनिवारी उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात शहरातील साखळकरवाडीतील दोघांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. हे दोन्ही कोदवली साईनगर येथील रूग्णाच्या संपर्कातील असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. त्यामुळे शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 22 झाली आहे. तर तालुक्याची एकूण रूग्णसंख्या ही 59 इतकी झाली आहे.
मात्र ग्रामीण भागात आढळून आलेले सर्व रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी आले असून आता केवळ शहरातीलच 22 रूग्ण ऍक्टीव्ह असल्याची माहिती तालुका आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. तालुक्यातील एकूण 59 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला तर 35 जण पूर्ण उपचाराअंती बरे होऊन घरी आले आहेत. त्यामुळे आता शहरातील 22 रूग्ण सध्या ऍक्टीव्ह आहेत. शहरात आतापर्यंत आढळलेल्या या 22 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी ग्रामीण रूग्णालयातील 4 कर्मचारी वगळता अन्य सर्वजणांनी वैद्यकीय अधीक्षकांनी आयोजित केलेल्या एका सत्संग कार्यक्रमाला हजेरी लावल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात 16 मे रोजी पहिला कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला होता. त्यानंतर तालुक्यात कशेळी, वडदहसोळ, ओणी, प्रिंदावण, कोतापूर, खिणगिणी, मिळंद, धाऊलवल्ली या गावात कोरोनाचे रूग्ण आढळले होते, मात्र हे सगळेरूग्ण बरे होऊन घरी परतत असताना व तालुक्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असतानाच शहरात गतसप्ताहात 3 जुलै रोजी एक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला. मात्र त्यानंतर राजापूर ग्रामीण रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह त्यांची पत्नी, आई व रूग्णालयातील चार कर्मचारी यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर कोदवली साईनगर येथील एकाच कुटुंबातील प्रारंभी तीन व त्यानंतर नऊ असे 12 जण कोरोना पॉझिटीव्ह आले आणि शहरात खळबळ उडाली. बघताबघता आठवडा भरात शहरातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 20 वर पोहोचली. या सर्वांच्या संपर्कात आलेल्या सुमारे 180 जणांना क्वारंटाईन करण्यात आले तर हायरिस्कमधील सुमारे 55 जणांचे स्वॅब घेण्यात आले. दरम्यान 2 दिवस एकही पॉझिटीव्ह रूग्ण आढळून न आल्याने आता शहरातील कोरोनाचा प्रसार थांबेल, असे वाटत असतानाच शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या अहवालात राजापूर शहरातील व कोदवली साईनगर येथील त्या पॉझिटीव्ह कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले दोघेजण पॉझिटीव्ह आले आहेत.









