वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय क्रिकेट संघ चालू वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळण्यासाठी जाणार आहे. या दौऱयापूर्वी कोरोना महामारी संकटामुळे भारतीय संघाला क्वारंटाईन कक्षात रहावे लागेल. पण त्याचा कालावधी कमी करण्यात येईल, अशी आशा भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी व्यक्त केली आहे.
सध्या क्वारंटाईनचा कालावधी दोन आठवडय़ांचा ठेवला जातो. पण भारतीय क्रिकेटपटूंना हॉटेल्सच्या रुममध्ये दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी ठेवण्याची मंडळाची इच्छा नाही. क्रीडा संदर्भात कोविड-19 च्या नियमावलीत बदल करावा लागेल, असे गांगुली यांनी म्हटले आहे. सध्या इंग्लंडमध्ये तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीनंतर कसोटी मालिका खेळविली जात आहे. इंग्लंड आणि विंडीज यांच्यात सध्या या मालिकेतील पहिली कसोटी सुरू आहे.
क्रिकेटपटूंना दोन आठवडय़ांच्या कालावधीसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी घ्यावी. या चाचणीनंतरच त्यांना बंदिस्त स्टेडियममध्ये प्रवेशासाठी परवानगी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱयासाठी भारतीय संघाला कोरोना संदर्भातील काही नियमांमध्ये शिथिलता मिळू शकेल, अशी आशा भारतीय क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांनी व्यक्त केली. या दौऱयात उभय संघात 4 कसोटी सामने खेळविले जाणार असून त्यापैकी एक सामना दिवसरात्रीचा आयोजित केला आहे. क्रिकेटपटूंना हॉटेलच्या रुममध्ये स्तब्ध बसून पंधरा दिवसांचा कालावधी काढताना त्यांच्या मानसिक स्थितीवरही विपरित परिणाम होऊ शकतो. त्यांची मानसिकता बिघडू शकते. याकरिता क्वारंटाईन कालावधीची मुदत कमी करण्याचा प्रयत्न भारतीय क्रिकेट मंडळाकडून केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱयापर्यंत माझे अध्यक्षपद राहील किंवा नाही याची खात्री मी देऊ शकत नाही. पण या दौऱयासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मात्र कोहलीकडेच निश्चित राहील, असे गांगुली यांनी म्हटले आहे.









