वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांनी देशातील विविध राज्यांच्या क्रीडामंत्र्यांबरोबर दोन दिवसांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला 14 जुलैपासून प्रारंभ होणार असून देशातील क्रीडा विकासाचा आराखडा निश्चित करण्याकरिता चर्चा होणार आहे.
या बैठकीमध्ये नेहरू युवा केंद्र संघटना तसेच राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चा केली जाणार आहे. कोरोना महामारीमुळे सध्या देशात लॉकडाऊनचा कालावधी सुरू असल्याने या कालावधीत या दोन्ही संस्थांच्या कार्याचा आढावा घेतला जाणार आहे. सध्या भारत देश लॉकडाऊनच्या दुसऱया टप्प्यात असून विविध राज्यात क्रीडा हालचाली पुन्हा सुरू करण्यासाठी तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा संबंधित राज्यांच्या क्रीडामंत्र्यांकडून सादर केला जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीत क्रीडा युवजन खात्यातर्फे कशापद्धतीने क्रीडा स्पर्धा सुरू करता येतील, यावरही चर्चा केली जाईल. कोरोनाशी लढत देण्याकरिता देशातील सुमारे 75 लाख स्वयंसेवक दिवसरात्र रुग्णांच्या सेवेत असल्याबद्दल त्यांचे केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी कौतुक केले आहे. या स्वयंसेवकांनी संपूर्ण देशामध्ये जनतेला आपले आरोग्य तंदुरुस्त राखण्याकरिता विविध सूचनांची माहिती दिली असून त्यांच्याकडून मास्कचे वाटप करण्यात आले आहे.









