वृत्तसंस्था/ चेन्नई-मुंबई
सौराष्ट्राचा क्रिकेटपटू तसेच भरवशाचा फलंदाज शेल्डॉन जॅक्सनने आता सौराष्ट्र रणजी संघाचा निरोप घेण्याचे ठरविले असून तो आगामी रणजी हंगामात पुडुचेरी संघाकडून खेळणार आहे.
जॅक्सनने आपल्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्राला गेल्या रणजी हंगामात पहिल्यांदा रणजी करंडक मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. 2019-20 च्या क्रिकेट हंगामात त्याने दहा सामन्यांतील 18 डावांत 50.56 धावांच्या सरासरीने 809 धावा जमविल्या होत्या. ‘सौराष्ट्र संघाचा निरोप घेण्याचा निर्णय मला खूपच अवघड जात आहे. पण माझ्या भविष्यातील क्रिकेट कारकीर्दीत व्यावसायिक क्रिकेटपटू बनण्यासाठी इतर राज्यातील संघाची निवड करावी लागली. तसेच एका संघातून दुसऱया संघात प्रवेश करण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला आहे,’ असे जॅक्सनने सौराष्ट्र क्रिकेट संघटनेला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. गेल्यावषी दुखापतीमुळे क्रिकेट हंगामाला मुकावे लागलेल्या माजी कसोटी गोलंदाज पंकज सिंगचे पुडुचेरी संघामध्ये पुनरागमन होत आहे. त्याचप्रमाणे पाँडिचेरी संघात पारस डोग्रा हा तिसरा पाहुणा क्रिकेटपटू असून त्याने या संघातील आपले स्थान कायम राखले असल्याचे पाँडिचेरी क्रिकेट संघटनेचे सचिव व्ही. चंद्रन यांनी सांगितले. 2011 साली शेल्डॉन जॅक्सनने आपल्या प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये सौराष्ट्र संघाकडून पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 49.42 धावांच्या सरासरीने 5634 धावा जमविल्या असून त्यामध्ये 19 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत दुसऱया संघाकडून खेळण्यात कोणत्याही क्रिकेटपटूला ना हरकत दाखल्याची गरज असते. सौराष्ट्र क्रिकेट संघटनेने जॅक्सनला हा दाखला दिला आहे. मुंबईचा माजी गोलंदाज आविष्कार साळवी याची पुडुचेरी संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.









