वृत्तसंस्था/ कोलकाता
कोरोना महामारीचा प्रसार पश्चिम बंगालमध्ये वाढत असून कोलकाता शहरातील पोलिसांसाठी येथील प्रख्यात ईडन गार्डन्सचे क्रिकेट संकुल कोरोना रुग्णांकरिता क्वारंटाईनसाठी वापरले जाणार असल्याची माहिती बंगाल क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने दिली. कोलकात्याच्या पोलीस खात्याकडून सदर ईडन गार्डन्सचे मैदान क्वारंटाईनसाठी द्यावे, अशी विनंती करण्यात आली होती.
या निर्णयामुळे आता ईडन गार्डन्सच्या परिसरात क्वारंटाईनसाठीच्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर कामकाज सुरू आहे. लाल बाजार येथे बंगाल क्रिकेट संघटनेचे वरि÷ अधिकारी आणि कोलकात्याचे खास आयुक्त जावेद शमीम यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर ईडन गार्डन्स मैदानाची सर्व तपासणी पोलीस विभागातर्फे करण्यात आली.
या बैठकीला बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अविषेक दालमिया, मानद सचिव स्नेहाशिष गांगुली तसेच पोलीस विभागाचे वरि÷ अधिकारी उपस्थित होते. या सर्व अधिकाऱयांनी शनिवारी ईडन गार्डन्सला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. ईडन गार्डन्समध्ये पाच गॅलरीज असून यापैकी ई, एफ, जी आणि एच येथील ब्लॉक्स क्वारंटाईनसाठी वापरले जाणार असून या ठिकाणी तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. कोलकात्यातील आतापर्यंत 544 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 411 जण या व्याधीतून पूर्ण बरे झाले आहेत तर दोन पोलिसांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.









