प्रतिनिधी/ चिपळूण
शंभर टक्के वेतन मिळण्याच्या मागणीसाठी जे. के. तालाबोट कंपनीतील 226 कामगारांनी गुरूवारपासून संप पुकारला आहे. शनिवारी सकाळी रात्रपाळीच्या कामगारांना दमदाटी करून बाहेर काढत गेट बंद केल्याने कामगारांच्या संतापात आणखी भर पडली. यातच हमीपत्र दिल्याशिवाय कंपनीत प्रवेश दिला जाणार नसल्याची नोटीस व्यवस्थापनाने गेटवर लावली आहे. मात्र कामगार मागणीवर ठाम असल्याने संप चिघळण्याची चिन्हे दिसून लागली आहेत.
गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीमध्ये असलेली जे. के. तालाबोट कंपनी कोरोना लॉकडाऊनमध्ये बंद झाल्यानंतर 27 एप्रिलपासून हळूहळू उत्पादन सुरू पेले. 8 मेनंतर कंपनी पूर्ण क्षमतेने म्हणजेच शंभर टक्के उत्पादन सुरू केले. मात्र उत्पादन सुरू केल्यानंतर कंपनीने पुढील मार्च 2021पर्यत 50 टक्केच वेतन देणार असल्याचे जाहीर केले. मात्र शंभर टक्के उत्पादन निघत असताना 50 टक्केच वेतन का, असा सवाल कामगारांनी उपस्थित केला. यानंतर हा विषय इंजिनिरिंग वर्क्स असोसिएशन या युनियनच्या माध्यमातून व्यवस्थापनपर्यंत नेण्यात आला. मात्र कंपनी व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मागणी अमान्य झाल्याने कामगारांनी गुरूवारपासून संप पुकारण्यात येत असल्याचे जाहीर केले.
गुरूवारपासून कामगारांनी संप पुकारल्यानंतर कंपनीचे उत्पादन ठप्प झाले. यातच कंपनीने उत्पादन देण्याबाबत आणि शांतता व सर्वसामान्य स्थिती अबाधित ठेवण्याबाबत हमीपत्र दिल्याशिवाय कोणत्याही कामगाराला कंपनीत प्रवेश दिला जाणार नसल्याची नोटीस कंपनीच्या गेटवर शनिवारी लावली. तसेच रात्रपाळीला अत्यावश्यक सेवेसाठी असलेल्या कामगारांनाही शनिवारी पहाटे 6.30 वाजता बाहेर काढून कंपनीचे गेट बंद केले. त्यामुळे शनिवारी एकही कामगार कंपनीत जाऊ शकला नसल्याचे गेटवर उपस्थित असलेल्या कामगार प्रतिनिधीनी सांगितले.
याबाबत युनियनचे युनिट अध्यक्ष वैभव कदम, उपाध्यक्ष प्रशांत दाते, सचिव तृप्ती हिरवे, खजिनदार प्रसाद भुवड, प्रकाश खरात, मकरंद कदम, राकेश घोरपडे आदींनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कंपनी शंभर टक्के उत्पादन आमच्याकडून काढून घेत असताना वेतन मात्र आम्हाला अर्धेच का? किती दिवस ही वेतन कपात करणार याचे उत्तरही कंपनी देत नाही. शिवाय कापलेले वेतन पुढेही देणार नसल्याचे सांगत असल्याने आमचे यामध्ये मोठे नुकसानच होणार आहे. त्यामुळे शंभर टक्के काम आमच्याकडून कंपनी करून घेत असेल तर आम्हाला त्याचा पूर्ण मोबदला हा मिळालाच पाहिजे या मागणीवर कामगार ठाम असल्याचे या पदाधिकाऱयांनी सांगितले.









