वृत्तसंस्था/ बर्लिन
नेशन्स लीग ए फुटबॉल स्पर्धेतील जर्मनी आणि स्पेन यांच्यातील सामना 3 सप्टेंबर रोजी जर्मनीत खेळविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. गेल्या मार्चमध्ये स्पेन आणि इटली यांच्यातील मित्रत्वाचा फुटबॉल सामना कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. 2020 च्या फुटबॉल हंगामात प्रथमच जर्मनीचा फुटबॉल संघ आपला पहिला सामना सप्टेंबरमध्ये खेळणार आहे.
कोरोना महामारी संकटामुळे 2020 ची युरोपियन चषक फुटबॉल स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्याने जर्मनीने आपल्या संघबांधणीच्या प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. आता जर्मनीच्या संघामध्ये अनेक दर्जेदार युवा फुटबॉलपटूंचा अधिक समावेश करण्याचा निर्णय जर्मन फुटबॉल फेडरेशनने घेतला आहे. नेशन्स लीग ए फुटबॉल स्पर्धेत जर्मन आणि स्वीत्झर्लंड यांच्यातील फुटबॉल सामना 6 सप्टेंबरला बेसिलमध्ये खेळविला जाणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जर्मनीचा संघ सहा दिवसांच्या कालावधीत तीन सामने खेळणार आहे तर नोव्हेंबरमध्ये लिपझिक येथे प्रदर्शनीय फुटबॉल सामना खेळणार असून त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अद्याप जाहीर झालेला नाही. हा सामना 11 नोव्हेंबरला खेळविला जाईल.









