वित्तीय समभागांच्या विक्रीचा प्रभाव : सेन्सेक्स 143 अंकांनी घसरण
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात तेजी आणि घसरणीचा प्रवास भारतीय शेअर बाजारात राहिला असल्याचे पहावयास मिळाले आहे. अंतिम दिवशी शुक्रवारी सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला आहे. ही घसरण होण्यामागे जागतिक पातळीवरील संकेत आणि वित्तीय कंपन्यांच्या समभागातील झालेली विक्री ही कारणे सांगितली जात आहेत. शुक्रवारी सेन्सेक्स दिवसअखेर 143 अंकांनी घसरुन बंद झाला आहे.
दिवसभरातील व्यवहारानंतर शेअर बाजार अंतिम क्षणी बंद होताना 143.36 अंकांनी घसरुन निर्देशांक 36,594.33 वर बंद झाला तर दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 45.40 अंकांनी घसरुन निर्देशांक 10,768.05 वर बंद झाला.
प्रमुख कंपन्यांमध्ये शुक्रवारी ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक 3 टक्क्मयांपेक्षा अधिक नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच इंडसइंड बँक, टायटन, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांची घसरण झाली आहे. अन्य कंपन्यांमध्ये मात्र सन फार्मा, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल आणि टीसीएसचे समभाग नफ्यात राहिले आहेत.
अन्य घडामोडींमध्ये प्रामुख्याने आशियासह अन्य बाजारात घसरण राहिली आहे आणि याचा प्रभाव अप्रत्यक्षपणे देशातील शेअर बाजारावर पडला असल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया बाजूला जगासोबत देशातील कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या आणि त्याच्या चिंतेने गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यास फारसे उत्सुक नाहीत असे तज्ञांनी म्हटले आहे. कारण जगातील कोविड रुग्णांची संख्या 1.22 कोटींच्या घरात पोहोचली आहे तर यातील 5.54 लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. हीच स्थिती देशात असून सध्या 7.93 लाखाच्या घरात कोविड बांधिताची संख्या पोहोचली आहे.