प्रतिनिधी / काणकोण :
शांत स्वभाव, मृदू व मितभाषी व्यक्तिमत्त्व, शुद्ध चारित्र्य आणि सर्वांशी मिळून मिसळून वागतानाच राजकारणात उच्च पदावर पोचल्यानंतर देखील पाय नेहमीच जमिनीवर ठेवून वागणे असे डॉ. सुरेश आमोणकर होते, अशा शब्दांत त्यांचे महाविद्यालयातील मित्र असलेल्या काणकोणच्या धिलोन देसाई आणि शाबा ना. गावकर या डॉक्टरांनी त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच्या आठवणींना उजाळा दिला.
नुकतेच निधन झालेले माजी आरोग्यमंत्री डॉ. आमोणकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काणकोण पालिका सभागृहात या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षा नीतू देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या या शोकसभेचे आयोजन डॉ. धिलोन देसाई यांनी केले होते. पक्षशिस्त पाळून त्यांनी दक्षिण गोव्यातून भाजपाची उमेदवारी लढविली. पराभव होणार याची कल्पना असताना देखील त्यांनी ही जोखीम पत्करली आणि दक्षिण गोव्यात भाजपाची पाळेमुळे रोवली. त्यानंतर ते राजकारणात यशस्वी झाले, तरी मूळ न विसरता त्यांनी काम केले. पुढील निवडणुकीसाठी पुंजी केली नाही. डॉक्टरी पेशा सांभाळला, पण त्याचा व्यवसाय केला नाही, अशा शब्दांत त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या सभेस काणकोण पत्रकार संघाचे अध्यक्ष अजित पैंगीणकर, काणकोणचे माजी नगराध्यक्ष संतोष गावकर, अजय भगत, उपनगराध्यक्ष गुरू कोमरपंत, नगरसेवक दयानंद पागी, हेमंत ना. गावकर तसेच काणकोण पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. डॉ. आमोणकर हे काणकोणचे जावई असल्यामुळे त्यांचा भावनिक संबंध या तालुक्याशी होता. या ठिकाणी त्यांचे वारंवार येणे-जाणे व्हायचे. काणकोण पालिकेच्या सभागृहाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले होते, याची आठवण संतोष गावकर यांनी करून दिली. तर त्यांच्या पुढाकारामुळे काणकोणातील मूत्रपिंड रुग्णांच्या सर्वेक्षणाचे काम करण्याची संधी मिळाली, असे मत अजित पैंगीणकर यांनी व्यक्त केले. डॉ. आमोणकर यांच्या अनेक आठवणी अजय भगत, दयानंद भगत यांनी मांडल्या. शेवटी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त करणारा ठराव घेण्यात आला.









