वृत्तसंस्था / मुंबई :
सध्याला कोरोनाचा परिणाम उद्योग, व्यवसायावर दिसत असून हळुहळू परिस्थिती पालटायला सुरूवात झाली आहे. गेल्या जूनमध्ये एकंदर नोकर भरतीत वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. मेच्या तुलनेत जूनमध्ये नोकर भरतीत 33 टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
नोकरी जॉबस्पीक यांनी पाहणी केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जूनमध्ये 1 हजार 208 जणांनी नोकरीकरता नोंदणी केली होती, जी मे महिन्याच्या तुलनेत 33 टक्के अधिक होती. वर्षाच्या तुलनेत पाहता ही भरती 44 टक्के कमीच होती, अशीही माहिती समोर आली आहे.
देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून त्यामुळे देशातील उद्योग-व्यापार बऱयाच अंशी प्रभावित झाल्याचे गेल्या दोन-तीन महिन्यात दिसून आले आहे. मेच्या अखेर व जूनच्या सुरूवातीस काही प्रमाणात व्यवहारांना सुरूवात झाली. भरतीत हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि ऑटो क्षेत्रांवर वाईट परिणाम झाला असल्याचे दिसून आले आहे. अनलॉक-1 च्या अंमलबजावणीनंतर मात्र जूनमध्ये सरकारने बऱयापैकी नियमात शिथिलता जारी केल्याने उद्योग सुरू झाले. या काळात कंपन्यांनी आपल्या उद्योगाकरीता आवश्यकतेनुसार नोकर भरतीचा कार्यक्रम घेतला. महिन्याप्रमाणे पाहता हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात भरती 107 टक्के वाढली तर ऑटो क्षेत्रात 77 टक्के वाढली आहे.









