कुडाळ तालुका मनसेचे प्रांताधिकाऱयांना निवेदन
महामार्गालगत, नदीकाठच्या परिसरात पूरस्थिती
घरांमध्ये पाणी शिरुन लोकांचे हाल
हायवे प्रशासन, ठेकेदारही कारणीभूत
वार्ताहर / कुडाळ:
मुसळधार पावसामुळे महामार्गालगत वा नदीकाठच्या परिसरात पूरसदृश स्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले. महामार्गालगतच्या घरांमध्ये अनपेक्षितरित्या पाणी शिरून लोकांचे प्रचंड हाल झाले. मुसळधार पावसाबरोबर हायवे प्रशासन व संबंधित ठेकेदार कंपनीही कारणीभूत आहे. पुराच्या पाण्यामुळे झालेल्या हानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्या, अशी मागणी मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे व सचिव राजेश टंगसाळी यांनी मनसेतर्फे कुडाळ प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून होणाऱया मुसळधार पावसामुळे जिल्हय़ातील हायवे लगतच्या व नदीकाठच्या परिसरामध्ये पूरस्थिती ओढवली आहे. त्यात हायवे लगतच्या घरांमधे पाणी शिरुन नुकसान झाले. एकंदर परिस्थितीस मुसळधार पावसासोबतच राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार दिलीप बिल्डकॉन कंपनीचा नियोजनशून्य कारभारही तेवढाच कारणीभूत आहे. ही वस्तुस्थिती असून मागील मान्सूनमध्येही अशाप्रकारे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग सुधारणा उपक्रमातील पावसाळी वाहत्या पाण्याच्या निचऱयासंदर्भात अक्षम्य त्रुटी समोर आल्या होत्या. त्या अनुषंगाने मनसेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करून 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये पावसाळी पाण्याच्या योग्य निचऱयासंदर्भात उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले होते. याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे दिसून आल्यानंतर 10 जून 2020 रोजी प्रांत कार्यालयास स्मरणपत्रही निवेदीत करून लक्ष वेधण्यात आले होते. परंतु अपेक्षेप्रमाणे याबाबत कोणतीही कार्यवाही न झाल्याने आजमितीस लोकांचे प्रचंड हाल होऊन मोठय़ा प्रमाणात नुकसान देखील झाले आहे. या परिस्थितीकडे आपण गांभीर्यपूर्वक लक्ष वेधून कसाल, ओरोस, वाडी हुमरमळा, पणदूर, वेताळबांबर्डे, पावशी, कुडाळ, पिंगुळी, झाराप, बिबवणे, तेर्सेबांबर्डे आदी गावातील पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश निर्गमित करावेत व संबंधितांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे. मनसेचे जिल्हा चिटणीस बाळा पावसकर, वैभव परब, रामा सावंत उपस्थित होते.









