पारंपरिक माती ऐवजी शाडू मातीचा करावा लागतो वापर
वार्ताहर / दोडामार्ग:
कोरोनाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीचा फटका अनेकांसोबत गणेश
मूर्तीकारांनाही बसला आहे. गणेशमूर्तींसाठी आवश्यक असणारी पारंपरिक माती लॉकडाऊनमुळे वेळेवर न आणता आल्याने गेल्या वर्षीच्या शिल्लक तुटपुंज्या मातीचा वापर या मूर्तीकारांना करावा लागत आहे. बऱयाच जणांना नाईलास्तव शाडू मूर्तीचा आधार घ्यावा लागला आहे.
कोरोनाचा फटका केवळ मोठे उद्योग, कंपन्या, व्यापारी यांनाच बसला आहे, असे नाही, तर सर्व स्तरावरील लोकांना, कारागिरांना देखील कोरोनाची झळ बसली आहे. यामधून गणेश मूर्तीकारही सुटले नाहीत. दोडामार्ग शहरातील मूर्तीकार गजानन तळवडेकर यांनी सांगितले की, शाडू मातीच्या मूर्तींसोबत पारंपरिक मातीच्या मूर्तीची सुद्धा मागणी दरवर्षी असते. आपण साधारणतः मे महिन्याच्या अखेरपर्यंत गोवा व अन्य ठिकाणांहून माती आणायचो. पण, यंदा मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने यंदाच्यावर्षी माती आणणे शक्य झाले नाही. त्यामुळे गेल्यावर्षीच्या शिल्लक असलेल्या तुटपुंज्या मातीवरच यंदा पारंपरिक मातीच्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत. यावर्षी देखील अनेक गणेश भक्तांची पारंपरिक मातीच्या मूर्तीची मागणी होती. परंतु त्यांना आम्ही आमची अडचण समजावून सांगितली आहे. यावर्षी नाईलास्तव काही शाडू मातीच्या मूर्तींचाही आधार घ्यावा लागत आहे, असे तळवडेकर यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातही शाडू मातीच्या मूर्ती केवळ शहरी भागातच नव्हे तर गावागावातील मूर्तीकारांसमोर देखील पारंपरिक मातीच्या मूर्तींचा प्रश्न उभा राहिला आहे. आयनोडे पुनर्वसन येथील विलास सुतार यांनी सुद्धा यंदाच्या वर्षीची शाडू मूर्तींची आगतीकता बोलून दाखविली. मार्च ते मे पर्यंतच्या लॉकडाऊनमुळे आपणास पारंपरिक माती आणता आली नाही. शिवाय आर्थिक संकटही उभे राहिले. त्यामुळे शिल्लक असलेल्या गतवर्षीच्या मातीच्या मूर्ती कमी प्रमाणात करता येणार असून यंदा शाडू मातीच्या मूर्तीचा सहारा घ्यावा लागला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.









