प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यात कोविड 19 मुळे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला. या मृत्यूस सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. भाजपचे उत्तर गोवा उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो यांना नागरिकांनी विकास करण्यासाठी निवडून दिले मात्र ते युवा पीढीला दारू पाजवून चुकीचा पायंडा घालून देत आहे. सरकारने म्हापशाचे नगरसेवक कार्व्हालो यांच्यावर कारवाई करावी अन्यथा 8 दिसाच्या आत आपण सरकारविरुद्ध गुन्हा नोंदवून फ्रँकी विरुद्ध तक्रार दाखल करणार आहे असा इशारा दिला.
यावेळी व्यासपीठावर बलभीम मालवणकर, दिगंबर शिरोडकर, संजू तिवरेकर व रियाज शेख हे कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे याबाबत अधिक माहिती देताना श्री. बर्डे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे मात्र सरकार अद्याप गंभीर नाही. कोविड इस्पितळामध्ये आज रुग्ण भरल्याने रुग्णांना ठेवण्यासाठी जागा नाही. उद्या 2 हजार, 5 हजार वा 10 हजार रुग्ण वाढले तर सामान्य जनतेने कुठे जावे. आज खासगी इस्पितळात 4 ते 5 लाख रुपये बिल होते. सामान्य जनतेने हे पैसे कुठून आणावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनी आम्ही उपजिल्हाधिकाऱयांकडे परवानगी मागितली होती मात्र ती आम्हाला नाकारण्यात आली. पण हेच सरकार भाजपच्या उपाध्यक्षांना पार्टीसाठी परवानगी देते हा कुठला न्याय. यावर सरकारने त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे असे बर्डे म्हणाले. अशा पाटर्य़ा करण्यास पैसा वाया घालण्यापेक्षा ते पैसे गरजूंना द्यावे जेणेकरून त्यांचे तुम्हाला आशीर्वाद मिळतील.
माजी आरोग्य मंत्र्यांचा कोविडमुळे मृत्यू झाला याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व त्यांच्या मंत्री मंडळातील सर्व मंत्री जबाबदार आहे. सरकारने याकडे गांभीर्य दाखवावे. कोरोनाबाबत अद्याप औषध आलेले नाही मग सरकार दर दिवशी इतके रुग्ण नेगेटिव्ह झाले म्हणून अहवाल देत आहे. मग या रुग्णांना कुठले औषध लागू होते याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे बर्डे म्हणाले.
यावेळी बोलताना रियाज शेख म्हणाले की, आपली मुलगी पर्वरी येथे संजय स्कूलमध्ये शिकत असून गेल्या काही दिवसांपासून अपंगांना मिळण्यात येणारे मानधन सरकारने बंद केल्याने आमच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. आपण म्हापसा येथे खासगी कामाला जात होतो. लॉकडाऊनचे कारण पुढे करून आपल्या कामावरही गदा आल्याने आम्ही आमचा उदरनिर्वाह कसा करायचा असे मत त्यांनी व्यक्त केले.









