खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात मंगळवारी दुपारपासून मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. पावसाचा जोर रात्रभर होता. बुधवारी सकाळी काहीकाळ उघडीप दिल्यानंतर पुन्हा पावसाचे तांडव सुरूच राहिले. दिवसभर जोरदार पाऊस आणि अधूनमधून उघडीप असेच वातावरण होते. या पावसामुळे तालुक्यातील नदी-नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. असोगाजवळील मलप्रभेच्या बंधाऱयात लाकूड अडकून रस्त्याचे व शेतीवाडीचे नुकसान झाले आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला असला तरी त्याला जोर नव्हता. मंगळवारी दुपारपासून मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. गेल्या 24 तासात सर्वात जास्त पाऊस कणकुंबी येथे 220 मि. मी. तर सर्वात कमी बिडी येथील 50.02 मि. मी. नेंद झाला. तालुक्याच्या जांबोटी, कणकुंबी, नेरसा, गवाळी, हेम्माडगा आदी पश्चिम भागात पावसाचा विशेष जोर आहे. खानापूरच्या मलप्रभा नदीघाटाजवळ पाणी पातळीत जवळपास 8 ते 10 फुटाने वाढ झाली आहे.
असोगा बंधाऱयात लाकूड अडकले
मलप्रभा नदीवर असोगा पूलवजा बंधाऱयाजवळील पाण्याच्या पातळीत बरीच वाढ झाली आहे. त्यातच बंधाऱयामध्ये लाकडे बऱयाच प्रमाणात अडकून राहिल्याने बंधाऱयातील पाणी उजव्या बाजूला वळून नदीपात्राबाहेर पडून असोगा-भोसगाळी बंधाऱयावरचा रस्ता पूर्णत: तुटला आहे. ते पाणी बंधाऱयाजवळील मारुती मंदिराला वळसा घालून पुन्हा मलप्रभा पात्रात जात आहे. यामुळे बंधारा आणि रस्त्याच्या मध्ये घातलेली सर्व भरती वाहून जाऊन ते पाणी शेतवडीत गेले आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. पावसाचा जोर असाच वाढत राहिल्यास बंधाऱयातील पाणी असोग्याच्या शेतवडीतही घुसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी याच बंधाऱयात लाकडे अडकून बंधाऱयाची भरती वाहून दोन्ही बाजूच्या शेतीवाडीचे नुकसान झाले होते. यामुळे मायनर इरिगेशन खात्याच्या अधिकाऱयांनी याची तातडीने पाहणी करून बंधाऱयात लाकडे अडकली की पाण्यामुळे दरवर्षी होत असलेले नुकसान टाळण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आखावी, अशी मागणी केली जात आहे. सध्या तातडीने अडकलेली लाकडेही बाजूला काढावीत, तरच यापुढील नुकसान टाळता येईल.
कुप्पटगिरी नाल्यावरही पाणी
खानापूरच्या नवीन पूलवजा बंधाऱयाजवळ असलेल्या कुप्पटगिरी रस्त्यावरील नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने हा रस्ता काहीकाळ बंद झाला होता. विशेष म्हणजे कुप्पटगिरी गावासाठी जाणारा हा जवळचा रस्ता असल्याने याच रस्त्यावरून कुप्पटगिरी ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. दरवर्षी मलप्रभेला पूर आला की या रस्त्यावरील पुलावरही पाणी येऊन तो रस्ताही बंद होतो. यामुळे नाल्यावरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. पण या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
बुधवारी सकाळी संपलेल्या 24 तासात पडलेला पाऊस
खानापूर 70.2 मि. मी., नागरगाळी 75.08, बिडी 50.02, कक्केरी 68.02, असोगा 92.02, गुंजी 102.08, लोंढा रेल्वेस्टेशन 114.0, लोंढा पीडब्ल्यूडी 113.02, जांबोटी 121.06, कणकुंबी 220.04 मि. मी. याप्रमाणे पावसाची नेंद झाली आहे.









