ऑनलाईन टीम / लखनऊ :
उत्तरप्रदेशातील पोलीस उपअधीक्षकासह 8 पोलिसांच्या हत्येस जबाबदार असलेल्या कुख्यात गुंड विकास दुबेचा जवळचा साथीदार उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला.
अमर दुबे असे पोलीस एन्काऊंटरध्ये ठार झालेल्या आरोपीचे नाव आहे. मागील आठवड्यात कुख्यात गुंड विकास दुबेला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर दुबेच्या टीमने गोळीबार केला. यात उपअधीक्षकासह 8 पोलीस मारले गेले. तेव्हापासून विकास दुबे आणि त्याचे साथीदार फरार आहेत.
या आरोपींच्या शोधासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष पथकं नेमली होती. पोलिसांनी काढलेल्या मोस्ट वॉन्टेड यादीत अमर दुबेचे नाव आघाडीवर होते. आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात अमर दुबेला एन्काऊंटरध्ये ठार केले.
दरम्यान, विकास दुबे हा हरियाणामधील फरिदाबाद येथे एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार हॉटेलमध्ये छापा टाकण्यात आला. मात्र, विकास दुबे तिथून निसटला. त्याच्या एका संशयित साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









