प्रा. सुभाष वेलिंगकर यांची माहीती
प्रतिनिधी / पणजी
भारतीय भाषा सुरक्षा मंच, गोवा सुरक्षा मंच, भारतमाता की जय तसेच लोकांच्या मागणीनुसार, राष्ट्रहितासाठी, हिंदू धर्माच्या रक्षणाहेतू मी गोवा सुरक्षा मंच पक्षाच्या पक्षप्रमुख म्हणून जबाबदारीतून मुक्त होत आहे. सध्या गोव्यात हिंदू महासंघटनेची गरज असून या कार्यासाठी मी या पदाचा त्याग करत आहे. यापुढे हिंदू महासंघटनेच्या कामासाठी सक्रीय राहणार आहे. त्यामुळे राजकारणातून मी सन्यास घेत आहे. यापुढे मी कोणत्याही प्रकारची निवडणूका लढविणार नाही. असे प्रतिपादन प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
पणजी येथे मंगळवारी भारत माता की जय संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परीषदेत वेलिंगकर यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांच्यासोबत भारतमाता की जय संघटनेचे पदाधिकारी अवधुत कामत, प्रा. प्रविण नेसवणकर, प्रा. दत्ता नाईक, व सुर्यकांत गावस उपस्थित होते.
हिंदू महासंघटना तयार करणे यासंदर्भात काम सुरु झाले असून आम्ही अनेक लहान मोठय़ा संघटनेच्या प्रमुखांच्या संपर्कात आहोत. त्यांच्याशी चर्चा देखील झाली आहे. महासंघटना तयार करण्यासाठी राजकारण सोडणे आवश्यक आहे. यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. असे वेलिंगकर यांनी यावेळी सांगितले.
केंद्रात देशहितासाठी अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये सीएए, एनआरसी, कलम 370 यांचा प्रामुख्याने समावेश आहे. परंतु काही हिंदू विरोधी संघटनांनी यांचे निमित्त करुन देशात उद्रेक मांडला. अनेक हिंदू मुली-बायकांचे बलात्कार केले. अनेक साधु संताची निर्घृणपणे हत्या केली. याचा प्रभाव गोव्यात देखील पाहायला मिळाला. गोव्यात आझांद मैदान येथे सीएए विरोधात मोठी सभा झाली परंतु यामध्ये अर्ध्यांपेक्षा जास्त हे बाहेरील मुस्लिम लोक होते. गोव्यात सध्या 65 हजार ते 80 हजार पर्यंत रोहींग्या, बांग्लादेशी खुसखोर लोक राहत आहे असा आमचा दावा आहे. आणि हेच लोक हिंदू धर्मावर आघात करत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदू महासंघटना गरजेची आहे. आणि यासाठी मी यापुढे काम करणार आहे. असे वेलिंगकर यांनी यावेळी सांगितले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे चर्च देखील यांना पाठींबा देत आहे. गोव्यात चर्चने कधीच हिंसाचाराला पाठींबा दिला नाही परंतु आता देत आहे. चर्चकडे आम्ही विनंती करतो त्यांनी या हिंसाचाराला पाठींबा देऊ नये. आमचा कुणाकडे, कुठल्याही धर्माविरुध्द वैर नाही आहे. परंतु आता आम्ही आमच्या धर्मांच्या रक्षाणासाठी काम करणार असून हिंदू धर्मावर आघात करण्यात आला तर आम्ही सहन करणार नाही असा इशारा वेलिंगकर यांनी यावेळी दिला.









