प्रतिनिधी / बेळगाव
धर्मवीर संभाजी चौकात बस प्रवाशांसाठी स्मार्ट बस थांब्यांची उभारणी करून विविध सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मात्र याठिकाणी बस थांब्यावर मातीचे ढीगारे ठेवण्यात आल्याने स्मार्ट बस थांब्यांची दुर्दशा झाली आहे. तसेच उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांना नळ जोडणी देण्यात आली नसल्याने इ-टॉयलेटची मोडतोड करण्यात आली आहे. याकडे स्मार्टसिटी कंपनीचे दुर्लक्ष झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरातील विविध भागात स्मार्ट बस थांब्यांची उभारणी करण्यात आली आहे. याअंतर्गत 34 ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मार्ट बस थांब्यांना आवश्यक सुविधा पुरविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच स्वच्छता आणि देखभालीकडे कानाडोळा करण्यात आल्याने स्मार्ट बस थांब्यांवर गैरसोयी अधिक झाल्या आहेत.पावसामुळे बसथांब्यामध्ये घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असल्याने प्रवाशांना गैरसोयीचे बनले आहे. अनगोळ, वडगाव, शहापूर, येळ्ळूर, टिळकवाडी अशा विविध भागात जाणाऱया बस प्रवाशांसाठी धर्मवीर संभाजी चौकात चार बस थांबे उभारण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतागृहांची उभारणी देखील करण्यात आली आहे. पण या स्वच्छतागृहांना अद्यापही नळ जोडणी करून देण्यात आली नसल्याने याचा वापर अद्याप सुरू नाही. प्रवाशांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात आली. पण याचा वापर होत नसल्याने स्वच्छतागृहाची मोडतोड करण्यात आली असून महागडय़ा स्वयंचलित यंत्रणेच्या साहित्याचे नुकसान करण्यात आले आहे.
स्मार्ट बस थांब्याची उभारणी झाल्यापासून या ठिकाणी नागरीकांऐवजी भटक्मया जनावरांचाच वावर अधिक आहे. विविध परिसरातील भटकी जनावरे याठिकाणी आसरा घेत असल्याने सर्व घणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच अलिकडेच या ठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे बस थांब्यांचा वापर होत नव्हता. या कालावधीत रस्त्याचे काम करताना मातीचे ढीगारे बस थांब्याच्या आवारात टाकण्यात आले होते. पण ते अद्यापही हटविण्यात आले नाहीत. येथील मातीचे ढीगारे व पडलेले साहित्य हटवून बस थांबे स्वच्छ करणे गरजेचे आहे. मात्र याकडे प्रशासनाने तसेच स्मार्टसिटी कंपनीच्या अधिकाऱयांनी कानाडोळा केला आहे. परिणामी मातीच्या ढीगाऱयांमध्येच नागरीकांना थांबावे लागत आहे. स्मार्ट सिटीसह संबंधीत विभागाच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन येथील समस्यांचे निवारणकरावे अशी मागणी होत आहे.









