प्रतिनिधी / बेंगळूर
मंडय़ा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुमलता अंबरिश यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना देखील क्वारंटाईन होण्याची अनिवार्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवंगत अभिनेते आणि माजी खासदार अंबरिश यांचे स्मारक निर्माण करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदार सुमलता अंबरिश यांनी 29 जून रोजी येडियुराप्पा यांची भेट घेऊन चर्चा केली होती. अंबरिश प्रतिष्ठानच्या बैठकीत एक समिती स्थापन करून बेंगळूरच्या कंठिरवा स्टुडिओमध्ये 1 एकर 34 गुंठे जागेत अंबरिश यांचे स्मारक निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्रीही सहभागी झाले होते. दरम्यान, सोमवारी सुमलता यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही कोरोनाची बाधा होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ते क्वारंटाईन होणार का?, याबाबत अद्याप समजलेले नाही.









