वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठक सोमवारी झाली. या बैठकीवेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील काही व्यापारीवर्गाने बाजार समितीचा परवाना घेतला आहे, मात्र त्यांनी बाजार समिती नियंत्रित जिन्नसांच्या व्यवहाराऐवजी इतर मालाची विक्री करण्यासाठी दुकाने भाडय़ाने दिली आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या भाजी मार्केट प्रवेशद्वारासमोरील बाजार समितीच्या गाळय़ांमधील थकित भाडेकरुंच्या दुकान गाळय़ासाठी पुन्हा निविदा काढणे या महत्त्वाच्या विषयाबरोबर बाजार समिती परवानाधारकांना परवाना देण्याबाबत, 140 हमाल बांधवांच्या परवान्याचे नूतनीकरण, नवीन 40 हमाल बांधवांना बाजार समिती परवाना देणे आदी ठराव करण्यात आले.
बाजार समिती कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन युवराज कदम हे होते. व्यासपीठावर उपसचिव महादेवी खनगौडर, सचिव डॉ. कोडीगौडा उपस्थित होते. यावेळी सचिव कोडीगौडा यांनी सर्वांचे स्वागत केले तर उपसचिवांनी मागील सभेचा वृत्तांत आणि जमाखर्चाचे वाचन केले.
यावेळी माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, आनंद पाटील, आर. के. पाटील, तानाजी पाटील, महेश कुगजी, प्रमोद पाटील, मनोज मत्तीकोप, अप्पय्या चौगुले, महेश जुवेकर, लगमाण्णा नाईक, संजीव मादार, रेश्मा पाटील, रेणुका पाटील, निंगाप्पा रामापूर आदी मान्यवर उपस्थित होते.









