नवी दिल्ली
सर्व घरांमध्ये एलपीजी गॅस कनेक्शनची सुविधा उपलब्ध असलेले हिमाचल प्रदेश देशातील पहिले राज्य ठरले आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हिमाचल गृहिणी सुविधा योजनेच्या लाभार्थींशी बोलताना यासंबंधी घोषणा केली आहे. पारंपरिक चुलीसाठी लाकूड गोळा करणे आणि स्वयंपाक करणे त्रासदायक होते तसेच महिलांच्या आरोग्यावरही विपरित प्रभाव पडत होता असे ठाकूर म्हणाले.
हे सर्व मुद्दे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या मागील कार्यकाळात उज्ज्वला योजनेस प्रारंभ करत ग्रामीण क्षेत्रातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध केल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. उज्ज्वला योजनेमुळे राज्यातील 1.36 लाख कुटुंबांना लाभ झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर देशातील कोटय़वधी लोकांनी स्वेच्छेने एलपीजी अनुदानाचा त्याग गेला आहे. उज्ज्वला योजनेचा लाभ घेता न आलेल्या कुटुंबांकरता राज्य सरकारने हिमाचल गृहिणी सुविधा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेच्या अंतर्गत 2,76,243 कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन प्रदान करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. गॅस कनेक्शनमुळे महिलांना धूरापासून मुक्ती मिळाली तसेच पर्यावरण संरक्षणाला हातभार लागला आहे. कोरोना महामारीने आमच्या संवादाच्या पद्धतींना बदलले आहे. अन्य राज्यांमधून आलेल्या होम क्वारंटाईनमधील लोकांवर नजर ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी महिलांना केले आहे.









