प्रतिनिधी
बेळगाव
महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ शनिवारी कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच बाजूलाच असलेल्या वीरभद्रनगरमध्ये कोरोनाने एका रहिवाशाचा बळीही गेला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारपासून नागरिकांना पालिका इमारतीत प्रवेशबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी रविवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती दिली आहे. पुढील आदेशापर्यंत ही प्रवेशबंदी असणार आहे, असेही त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. महानगरपालिकेच्या कार्यालयापासून जवळच कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
आवश्यक सेवांसाठी पालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काऊंटर उघडण्यात आले आहेत. नागरिकांनी आपले अर्ज या काऊंटरवर द्यावेत. अर्जांवर मोबाईल क्रमांकाचा उल्लेख करावा. तुम्ही दिलेल्या अर्जावर कार्यवाही केल्यानंतर मोबाईलवरून माहिती देण्यात येईल, असे आवाहन पालिका आयुक्तांनी बेळगावकरांना केले आहे.