ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यातील ‘कोरोना परिस्थिती हाताळण्यात’ एकहाती सत्ता असून देखील भाजप कमी पडत आहे. उपाययोजना करण्यास पुणे मनपा ‘आरोग्य प्रमुख’ असफल ठरत आहेत. आरोग्य प्रमुखांची सर्व कामे आणि कर्तव्ये आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हेच पार पाडत असल्याने आरोग्य प्रमुखांची नेमकी भूमिका काय हे कळत नाही, असा आरोप राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी आज पुणे श्रमिक पत्रकार संघातील पत्रकार परिषदेत केला.
प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र, पुणे शहराची माहीती असलेला व स्थानिक व सक्षम अधिकारी नियुक्त करा, अशी मागणी पुणे ‘राज्य सरकार’कडे केल्याचे देखील तिवारी यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे गट नेते आबा बागूल हे देखील उपस्थित होते.
तिवारी म्हणाले, भाजपला पुण्यातील कोरोना परिस्थिती हाताळता आली नाही. भरीव तरतूद करता आली नाही. उपाययोजना करण्यास आरोग्य प्रमुख असफल झाले. आरोग्य प्रमुखांची नियुक्ती देखील निकषांनुसार झालेली नाही. त्यामुळे आरोग्य विषयक प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले पाहिजे.
पालिकेचे डॉ. रामचंद्र हंकारे ‘आरोग्य प्रमुख’ पदास न्याय देण्यास असमर्थ आहेत. आरोग्य प्रमुखांनी मार्च महिन्यात अंदाज पत्रकात आग्रही वाढीव तरतूद करायला हवी होती. खासगी रुग्णालयांशी करार करण्यासारख्या गोष्टींमध्ये देखील आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांना लक्ष घालावे लागत आहेत. पुणे मनपा ‘आरोग्य प्रमुखांनी’ मनपाच्या आरोग्य यंत्रणा व इन्फ्रास्ट्रक्चर वर अधिक लक्ष देवून त्या सक्षम करणे गरजेचे आहे पण एकंदर आढावा घेता ते खासगी रुग्णलयांकडे कल असल्याचे प्रत्ययास येते, असे देखील गोपाळ तिवारी यांनी सांगितले. खासगी रुग्णालये तर होम आयसोलेशनसाठी देखील प्रतिदिन 3 ते 5 हजार रुपये घेत असल्याचा आरोपही तिवारी यांनी केला.








