मिरवणूकीचा नव्हता थाटमाट,
प्रतिनिधी/ सातारा
शेतात राबणाऱया बैलांना नटवून, सजवून त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढण्याचा सण म्हणजेच बेंदूर. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे गावोगावी बेंदूर सण अतिशय साध्या पद्धतीने शेडमध्येच बैलांना झुल घालून, शिंगे रंगवून पूजन करुन साजरा करण्यात आला. दरम्यान, शहरालगतच्या उपनगरातही यावर्षी शेतकऱयांनी घरातच बेंदूर साजरा करण्यात आला. काही ठिकाणी ग्रामदेवतांना साधेपणाने दर्शन घेवून सजवलेल्या आपल्या सर्जाराजांच्या जोडीला पुन्हा बळीराजाने शेड दाखवले.
बेंदूर सणाला बळीराजाच्या घरी मोठा उत्साह असतो. आदल्या दिवसापासूनच बैलांच्या सेवेला सुरुवात होते. यंत्रयुगातही अजून बैलांसाठीचा बेंदूर महत्वाचा सण साजरा करण्यात येतो. बेंदराच्या दिवशी बळीराजा घरात गोडधोड करुन सकाळीच सर्जाराजास सजवण्यास सुरुवात करतो. सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी मात्र कोरोनाच्या संकटामुळे मोजक्याच ठिकाणी साध्या पद्धतीने वाजंत्री न लावता मिरवणूका काढल्या. त्याही केवळ ग्रामदेवतांना दर्शन घेवून पुन्हा शेडमध्ये नेण्यात आले. सातारा शहरात करंजे येथे तर यावर्षी मिरवणूका काढण्यात आल्या नव्हत्या. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका योजनेमध्ये बैल असायचे. यावर्षी कोरोनामुळे त्यांनीही मिरवणूक काढणे टाळले. तसेच ट्रक्टरच्या मिरवणूकाही न काढण्याचा निर्णय काही गावांमध्ये घेण्यात आला.








