संविताश्रमाकडून वृद्ध दांपत्याचा कैवार : सावंतवाडीत केले उपचार
प्रतिनिधी / ओटवणे:
मळगाव येथे तीन आठवडे रस्त्यावर असलेल्या निराधार वृद्ध दांपत्याच्या मदतीला पणदूर येथील संविता आश्रम ही सेवाभावी संस्था धावून आली. या दांपत्यामधील जखमी वृद्धाला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ. वजराटकर आणि डॉ. मुरली चव्हाण यांनी संविताश्रमाचे लक्ष वेधले होते. या वृद्धावर उपचार केल्यानंतर या दांपत्याचा सांभाळ करण्यासाठी संविता आश्रमाची टीम दाखल झाली. आश्रमाचा आधार मिळाल्याने या दांपत्याच्या डोळय़ातून आनंदाश्रू तरळले.
मूळचे रेडी येथील दत्ताराम धोंडू लाड आणि सौ. सुहासिनी लाड हे दांपत्य गेल्या पंधरा वर्षांपासून मळगावात भाडय़ाने राहत होते. सण, उत्सव व जत्रोत्सवात फुले विकून आलेल्या पैशातून दोनवेळच्या जेवणाचा खर्च कसाबसा भागत होता. मात्र, दत्ताराम यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पत्नीसह झोपडीत राहावे लागले. मात्र, पावसाळय़ाच्या तोंडावरच ही झोपडी जमीनदोस्त झाल्याने हे दांपत्य भरपावसात रस्त्यावर आले. मळगाव ग्रामस्थांसह सरपंच बाबू गावडे, पोलीस पाटील रोशनी जाधव आदींनी त्यांची दोनवेळच्या जेवणाची सोय केली.
मात्र, दत्ताराम यांच्या पायाला जखमा झाल्या. या दांपत्याची परवड पाहून जिल्हा वाहतूक पोलीस नर यांनी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते देव्या सूर्याजी यांचे लक्ष वेधले. त्यानंतर सूर्याजी व त्यांच्या सहकाऱयांनी तात्काळ या दांपत्याला उपचारासाठी सावंतवाडीत आणले. डॉ. वजराटकर, डॉ. मुरली चव्हाण, नर्स संध्या साळगावकर यांनी जखमी वृद्धावर उपचार केले. त्यानंतर दांपत्याला निवाऱयासाठी संविता आश्रमाचे लक्ष वेधले.
संविता आश्रमाचे संदीप परब, उदय कामत, प्रसाद आंगणे, विजय नाईक, जानकी आंगणे, प्रेमानंद कासकर, पूजा कासकर सावंतवाडीत दाखल झाले. त्यांना सावंतवाडीत येण्यासाठी तहसीलदार राजाराम म्हात्रे, पोलीस निरीक्षक शशिकांत खोत, पणदूर सरपंच दादा साईल, पोलीस पाटील देऊ सावंत, युवा रक्तदाता संघटनेचे देव्या सूर्याजी, अमित गवंडळकर, अमेय तेंडोलकर, संदीप निवळे, मेहर पडते, जोसेफ आल्मेडा, सौरभ डेगवेकर, विनायक गवस यांचे सहकार्य लाभले. या वृद्ध दांपत्याला आश्रमात रुम क्वारंटाईन करण्यात येणार आहे.
संविताश्रमाचे मदतीचे आवाहन
जिल्हय़ातील दानशूर व्यक्तींसह स्वयंसेवी संस्थांच्या मदतीवरच संविता
आश्रमातील 114 निराधार व्यक्तींची देखभाल व जेवणखाण्याची सोय केली जाते. मात्र, गेल्या साडेतीन महिन्यापासून लॉकडाऊन असल्याने याचा फटका आश्रमाला बसला आहे. दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांकडून मिळणारी मदत मंदावली आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, स्वयंसेवी संस्था यांनी आश्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थापक संदीप परब यांनी केले आहे.









