प्रतिनिधी / कोल्हापूर
राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या दुसऱया टप्प्यातील उभारणीसाठी शासन कटिबध्द आहे. या स्मारकासाठी 8 कोटी 27 लाखाच्या दुसऱया टप्प्यातील उभारणीच्या प्रस्तावाचा शासनस्तरावर पाठपुरावा करुन आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात पुढाकार घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मंत्री वडेट्टीवार यांनी कोल्हापुरातील कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन राजर्षी शाहुंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर नर्सरी बागेतील राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळास भेट देऊन अभिवादन केले.
महापौर निलोफर आजरेकर आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांनी मंत्री वडेट्टीवार यांना राजर्षी शाहू छत्रपती समाधी स्मारकाच्या उभारणीबाबतची माहिती दिली. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, चंद्रकांत जाधव, महानगरपालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रातांधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार शितल मुळे-भामरे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत, देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, वसंतराव मुळीक, दिलीप देसाई, नगरसेवक अशोक जाधव, नगरसेवक मोहन सालपे, नगरसेवक सुभाष बुचडे, नगरसेवक डॉ. सदिप नेजदार,संजय लाड, सागर यवलुजे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, विविध विभागांचे अधिकारी आणि शाहुप्रेमी नागरिक उपस्थित होते.