पणजी:
राज्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून काल गुरुवारी सर्वाधिक 95 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोना सक्रीय रुग्णांचा आकडा 744 वर पोचला आहे. फेंडा पोलीस स्थानकाला कुलूप ठोकण्याची पाळी कोरोनाने आणली आहे. तेथील तब्बल 18 पोलिसाना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाचे थैमान गोव्याला कोणत्या दिशेने नेईल, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कोरोनाच्या सोबत जगायला हवे, असे धोरण सरकारने स्पष्ट केल्याने लोकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. काल गुरूवारी 64 रुग्ण कोरानामुक्त झाल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे.
राज्यात कोरोना झपाटय़ाने वाढत आहे. त्याचबरोबर रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही चांगले असल्याने सक्रीय कोरोनाचा आकडा कमी होत आहे. मात्र गोव्याबाहेरून येणाऱया रुग्णांची संख्या वाढत असल्याने बाहेरून कोरोना वाहक गोव्यात येत आहेत हेही स्पष्ट होत आहे. रस्ता वाहतूक, रेल्वे व विमान प्रवाशाद्वारे आलेल्या कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 116 एवढा आहे.
सांखळीचा आकडा 34 वर पोचला
सांखळीत कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. सांखळीतील रुग्णंसख्या 34 वर पोचली आहे. सांखळीत झपाटय़ाने वाढ होऊ लागल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सांखळीसह अन्य भागांमध्येही रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोक सध्या कोरोनाच्या दहशतीखाली आले आहेत. दरदिवशी रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकही हतबल झाले आहेत. ग्रामीण भागातही वाढू लागल्याने चिंता वाढली आहे.
आमदारांनी स्वत:ची कोरोना चाचणी करावी : सभापती
राज्यातील सर्व आमदारांनी स्वत: कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सभापती राजेश पाटणेकर यांनी केले आहे. प्रशासकीय कामासाठी आमदारांना सर्वत्र फिरावे लागते. त्यामुळे कोरोना संसर्गाबाबत काळजी घेण्यासाठी आमदारांनी स्वेच्छेने चाचणी करावी, असेही सभापतीनी स्पष्ट केले आहे.
येत्या 27 जुलैपासून सुरु होणाऱया विधानसभा अधिवेशन काळात मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. सोमवारी एसओपी बाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सोमवारी त्याबाबतची माहिती सर्वांना दिली जाणार आहे. यावेळी अधिवेशन काळात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. विधानसभा सदस्यांच्या स्टाफवरही निर्बंध घालण्यात येणार आहे. विधिमंडळ सचिवांनी एक नोटीस जारी केली असून त्याद्वारे आमदारांना सूचना केल्या आहेत. आमदारांनी बैठका तसेच माध्यमांना संबोधित करणे व अन्य उपक्रमातून दूर रहाणे असे सूचित केले आहे. विविध समित्यांचे अहवाल विधिमंडळ सदस्यांनी सर्क्युलेशन पद्धतीनेच स्वीकारावे असेही सूचित केले आहे.
झुवारीनगर, कुडतरी, चिंबलमध्येही वाढतोय कोरोना
मांगोरहील येथील कोरोना बाधितांचा आकडा 240 झाला आहे. तर मांगोलहीलशी संबंधीत रूग्णांचा आकडा 221 आहे. सडा वास्को येथील रुग्णसंख्या 63 झाली आहे. तर बायणा 54, न्युवाडे 37, झुवारीनगर 70, खारीवाडा येथे रुग्णसंख्या 24 झाली आहे. कुडतरी येथील रोरोनाबाधित आकडा 31 वर पोचला आहे. तर चिंबल येथील संख्या 27 झाली आहे. मोर्ले येथील रुग्णसंख्या 22 झाली आहे. आंबेलीशी संबंधित रुग्णसंख्या 24 झाली आहे. मडगाव येथील रुग्णसंख्या 16 झाली आहे.
3413 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 1951 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 1367 अहवाल अजून यायचे आहेत.
कोविडसंदर्भात सरकारतर्फे तज्ञांची समिती स्थापन
सर्वोच्च न्यायालयातील एका याचिकेसंदर्भात गोवा सरकारने तज्ञांची एक समिती स्थापन केली असून गोमेकॉचे निवृत्त डीन डॉ. व्ही. एन. जिंदाल यांची या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. या समितीवर विद्यमान गोमेकॉचे डिन, निवृत्त आरोग्य संचालक संजीव दळवी, निवृत्त आरोग्याधिकारी डॉ. प्रदीप पडवळ हे सदस्य असून आरोग्य संचालक हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. ही समिती मडगावच्या कोविड इस्पितळाला भेट देतील. पहाणी करून तेथील व्यवस्थापनाला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर कोविड संदर्भात असलेल्या इस्पितळांना आवश्यक त्या सूचना करतील आणि सरकारला आपला अहवाल सादर करतील.









