
नवी दिल्ली : देशातील 15 लाख छोटय़ा व्यवसायिकांना मदत करण्यासाठी जागतिक बँक 750 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्यासाठी तयार झाली आहे. देशातील छोटय़ा उद्योगांना यायोगे बळ देण्याचा जागतिक बँकेचा प्रयत्न असेल. सध्याला कोरोनामुळे उद्योग क्षेत्राला अडचणीचे दिवस झेलावे लागत आहेत. अनेक उद्योगांना कामगारांची कपात करावी लागते आहे तर काहींच्या वेतनातही कपात करावी लागते आहे. ही परिस्थिती लक्षात घेत आर्थिक पाठबळाची गरज असलेल्या अशा उद्योगांना जागतिक बँकेने कर्जरूपी मदत करण्याचे निश्चित केले आहे. देशात 15 लाखाहून अधिक छोटे-मध्यम गटातील व्यवसाय कार्यरत आहेत. लक्षावधी नोकऱया या उद्योगांनी टिकवल्या आहेत. म्हणूनच या उद्योगांना आवश्यक ते अर्थसहाय्य कर्जरुपी देण्यासाठी जागतिक बँकेने पुढाकार घेतला आहे. यामुळे उद्योगांमध्ये तरलता येणार आहे. आर्थिक प्रश्न सुटून व्यवसाय कायमस्वरूपी सुरू ठेवता येणार आहे.
जिंदाल विकणार ओमानमधील कारखाना

मुंबई : पोलाद उत्पादन क्षेत्रात कार्यरत असणाऱया जिंदाल स्टीलकडून आपल्या डोक्मयावरचे कर्जाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कंपनी ओमान मधील टेम्पलार इन्वेस्टमेंट लिमिटेडला आपला कारखाना विकून सात हजार पाचशे कोटी रुपये उभारणार आहे. यायोगे कंपनीचे डोक्मयावरचे कर्जाचे ओझे आपसूकच कमी होऊ शकणार आहे. जिंदाल स्टील अँड पॉवर लिमिटेड या सहकारी कंपनीचा टेम्पलारबरोबर विक्रीचा व्यवहार येणाऱया काळात होणार आहे. यासंदर्भात प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात येते. साधारण महिन्याभरात हा व्यवहार पूर्ण होईल असे जिंदालच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.
श्रीकांत वैद्य आयओसीचे नवे चेअरमन

नवी दिल्ली : पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीवरची कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या चेअरमनपदी श्रीकांत माधव वैद्य यांची निवड करण्यात आली आहे. नव्या चेअरमनपदाचा कार्यभार त्यांनी एक जुलैपासून सांभाळण्यास सुरुवात केली आहे. याआधी त्यांच्याजागी संजीव सिंह हे होते. 30 जून रोजी ते सेवानिवृत्त झाले. श्रीकांत वैद्य इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे चेअरमन तर असतीलच शिवाय चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि इंडियन ऑईल टँकिंग लिमिटेड यांचेही चेअरमनपद सांभाळणार आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या प्रमुखपदाची धुराही खांद्यावर घेणार आहेत.









