जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आदेश : तीन सदस्यीय समिती नियुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात बाधित झालेल्या व्यक्तींना मोबदला देण्यासाठी पैसे घेतले जात असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय चौकशी समिती नेमून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना हे प्रकरण शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महामार्ग चौपदरीकरणातील बाधित लोकांना मोबदला देताना कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱयांकडून पैसे मागितले जातात व मोबदला देण्यास टाळाटाळ केली जाते, अशा अनेक तक्रारी येताच आमदार नाईक यांनी 29 जूनला प्रांताधिकारी कार्यालयामध्ये धडक देत जाब विचारला होता व आपल्या मतदारसंघात असा भ्रष्टाचार चालू होणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे थेट लेखी तक्रार केली व कुडाळ प्रांताधिकाऱयांसह प्रांत कार्यालयातील नायब तहसील व अन्य कर्मचारी पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार केली. तसेच पैसे मागणीबाबतचे ऑडिओसुद्धा सादर केले आणि या सर्व भ्रष्ट अधिकाऱयांची रितसर चौकशी करून कारवाई करावी तसेच त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणीही केली होती.
कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. या मध्ये जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्षा शिंगण, लेखाधिकारी नितीन सावंत या अधिकाऱयांचा समावेश आहे. या समितीने सखोल चौकशी करून तात्काळ अहवाल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.









