प्रतिनिधी/ गुहागर
कृषी विभागाच्या विविध अधिकाऱयांसह लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात उतरत लावणी, चिखलणीसारख्या कामाचा अनुभव घेत कृषी दिन साजरा केला. गुहागर पंचायत समिती व पाटपन्हाळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात ‘लॉकडाऊन’चे नियम पाळत कृषी अधिकाऱयांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले.
पाटपन्हाळे-भेकरेवाडी येथील जयवंत कदम यांच्या शेतामध्ये आयोजित कार्यक्रमात उपसभापती सुनील पवार यांनी नांगरणीसह लावणी करत शेतकऱयांबरोबर कामाचा आनंद लुटला. यावेळी चारसूत्री लागवडीच्या प्रात्याक्षिकात लोकप्रतिनिधींसह अधिकारीही सहभागी झाले. युरिया ब्रिकेटचा कशा पद्धतीने उपयोग करावा, याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. शेतीच्या विविध योजना, फळबाग लागवडीची माहिती शेतकऱयांना देण्यात आली. यामध्ये गटविकास अधिकारी प्रकाश भोसले, पंचायत समिती सभापती विभावरी मुळे, कृषी अधिकारी बी. जी. चव्हाण, कृषी विस्तार अधिकारी राजकुमार धायगुडे, तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे, पाटपन्हाळे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी रमेश बेंडल, कृषी पर्यवेक्षक डी. एस. कोळी, दिलीप पवार, कृषी सहाय्यक कु. पाटील, पाटपन्हाळे ग्रामपंचायत सदस्य अमरनाथ मोहिते, पांडुरंग भेकरे, सुरेश भेकरे, यशवंत कदम, बाळू भेकरे, शांताराम भेकरे, अजित कदम, चंद्रभागा भेकरे, सुचिता भेकरे, दक्षता भेकरे, शुभांगी कदम आदींनी सहभाग घेतला.









