माजी क्रिकेटपटू माईक हसीचा विश्वास, डिसेंबरमध्ये उभय संघात रंगणार चार सामन्यांची कसोटी मालिका
वृत्तसंस्था/ मेलबर्न
ऑक्टोब्र महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. टी 20 मालिकेने या दौऱयाची सुरुवात होणार असून यानंतर उभय संघात कसोटी आणि वनडे मालिका खेळविली जाईल. हा दौरा भारतीय संघासाठी विशेष महत्वाचा असेल.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कामगिरीवर साऱयांचे लक्ष असणार आहे. रोहित वनडे सोबत कसोटी सामन्यातही सलामीला खेळणार आहे. तो प्रथमच विदेशी दौऱयात कसोटीमध्ये सलामीला खेळणार असल्याने त्याच्या कामगिरीकडे सर्वाधिक लक्ष असणार आहे. त्याने यापूर्वी कसोटीत चांगली कामगिरी केली आहे. आता, आगामी कसोटी मालिकेत ‘हिटमॅन’ सुपरहिट ठरेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मायकल हसीने व्यक्त केला आहे.
गतवर्षी मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात रोहितने सलामीला खेळत दमदार कामगिरी केली होती. आफ्रिकन गोलंदाजांना त्याने चांगलेच चोपले होते. यानंतर न्यूझीलंड दौऱयात स्नायू दुखावल्यामुळे तो दोन कसोटी सामने खेळू शकला नव्हता. जगातील कोणत्याही फलंदाजाला ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर खेळणे एक परीक्षाच असते. परंतु वनडेप्रमाणे कसोटीमध्ये देखील रोहितला चांगली लय सापडेल. ऑस्ट्रेलिया दौरा गाजवण्याची क्षमता आणि कौशल्य दोन्ही त्याच्याकडे आहे, असेही हसी यावेळी म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या कठीण अशा खेळपट्टय़ावर सलामीला फलंदाजी करणे आव्हानात्मक असते, पण हिटमॅन परिस्थितीशी जुळवून घेत दमदार कामगिरी करेल, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.
स्मिथ-वॉर्नरचे पुनरागमन भारतासाठी अडचणीचे
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांचे पुनरागमन भारतासाठी अडचणीचे ठरणार आहे. 2018 साली भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली होती. स्मिथ आणि वॉर्नर यांच्यावर बंदी घालण्यात आल्याने ते ही मालिका खेळू शकले नव्हते. आता, आगामी मालिकेसाठी स्मिथ आणि वॉर्नर यांच्या पुनरागमनाने संघ मजबूत झाला आहे. अति उष्ण तापमानात भारतास ऑस्ट्रेलिया चांगली टक्कर देऊ शकेल. याशिवाय, ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ा या वेगवान गोलंदाजीसाठी पोषक असल्याने गोलंदाजही चांगली कामगिरी करतील असा विश्वास हसीने व्यक्त केला.
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका
1. पहिली कसोटी – 3 ते 8 डिसेंबर (ब्रिस्बेन)
2. दुसरी कसोटी – 11 ते 15 डिसेंबर (ऍडलेड)
3. तिसरी कसोटी – 26 ते 30 डिसेंबर (मेलबर्न)
4. चौथी कसोटी – 3 ते 7 जानेवारी (सिडनी)









