राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा प्रस्तावित
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत राम मंदिर उभारणीसंदर्भात संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रात संतांनी पंतप्रधानांना अयोध्येत मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करण्याची विनंती केली आहे. पंतप्रधानांनी मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन करावे, गर्दी न होऊ देण्याची जबाबदारी आमची असल्याचे संतांनी पत्रात नमूद केले आहे.
पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मंदिर उभारणीच्या कार्याचा शुभारंभ करण्याची विनंती केल्याची माहिती राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष नृत्यगोपाल दास यांनी दिली आहे. मोदींच्या दौऱयादरम्यान कुठल्याही प्रकारे गर्दी होऊ देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
ऐतिहासिक ठरणारे भूमिपूजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा आभासी पद्धतीने होऊ नये अशी लोकांची इच्छा आहे. ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी राम मंदिर उभारणी समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना आमंत्रण पाठविले आहे. भूमिपूजन लवकरात लवकर व्हावे आणि मंदिर उभारणीचे काम सुरू करण्यात यावे, अशी जनतेची इच्छा असल्याचे नृत्यगोपाल दास यांनी म्हटले आहे.
श्रावणात व्हावी सुरुवात
21 जुलैपासून श्रावण मास सुरू होत आहे. या पवित्र मासमध्ये राममंदिर उभारणीस प्रारंभ झाल्यास उत्तम ठरणार आहे. पंतप्रधानांना पाठविण्यात आलेले आमंत्रण ते स्वीकार करतील आणि श्रावण मासातच अयोध्येत येतील, अशी अपेक्षा असल्याचे संतांनी म्हटले आहे.









